अश्विन भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक! खास गौरव सोहळ्यात माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत, सुनील गावसकर हेसुद्धा उपस्थित होते.
अश्विन भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक! खास गौरव सोहळ्यात माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक

चेन्नई : रविचंद्रन अश्विन हा भारताला लाभलेल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटूंनी ३७ वर्षीय अनुभवी ऑफस्पिनरचे कौतुक केले. अश्विनचा रविवारी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनतर्फे (टीएनसीए) खास गौरव करण्यात आला. कारकीर्दीतील १००वी कसोटी तसेच ५०० कसोटी बळींच्या निमित्ताने अश्विनला कुटुंबीयांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत, सुनील गावसकर हेसुद्धा उपस्थित होते. अश्विनला यावेळी ५०० गोल्ड कॉईन्स आणि १ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. इंग्लंडविरुद्ध नुकताच झालेल्या मालिकेत अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. तसेच कारकीर्दीतील १००वा कसोटी सामना खेळला.

“अश्विनने १०० कसोटी खेळण्याचे श्रेय एन. श्रीनिवासन यांनाही जाते. त्यांनी अश्विनमधील कौशल्य हेरून त्याला लवकर संधी दिली. अश्विनचे व्यक्तिमत्व जितके प्रभावी आहे. तितकाच तो हुशारही आहे. भारताला लाभलेल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी तो एक नक्कीच आहे,” असे गावसकर म्हणाले. त्याशिवाय अश्विनने कारकीर्दीत अनेक आव्हाने समर्थपणे पेलली. तो भविष्यात माझ्याही कसोटी बळींचा विक्रम मोडीत काढेल, असे मत कुंबळेने व्यक्त केले. भारतासाठी कुंबळेने सर्वाधिक ६१९ बळी मिळवले आहेत, तर अश्विनच्या नावावर सध्या ५१६ बळी आहेत.

यावेळी अश्विनची पत्नी प्रीती हिने राजकोट कसोटीदरम्यान आईची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने अश्विन माघारी परतल्यावर त्याची मानसिक स्थिती कशी होती, ते सांगितले. तसेच त्या काळात भारतीय संघ व बीसीसीआयने अश्विनला पाठिंबा दिल्याने तिने दोघांचे आवर्जून आभारही मानले.

logo
marathi.freepressjournal.in