आशिया बॅडमिंटन सांघिक स्पर्धा: भारतीय महिला अंतिम फेरीत

माजी जागतिक विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध खेळताना भारताच्या अश्मिता हिने क्रॉस, ड्रॉप आणि उडी मारून स्मॅशेस लगावले.
आशिया बॅडमिंटन सांघिक स्पर्धा: भारतीय महिला अंतिम फेरीत

शाह आलम (मलेशिया) : भारतीय महिला संघाने दोन वेळच्या विजेत्या जपानवर ३-२ असा विजय मिळवत आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयासह भारताने आशिया स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात, जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी असलेल्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत तसेच ५३व्या क्रमांकावरील अश्मिता चाहिला हिने महिला एकेरीत आणि १७ वर्षीय अनमोल खर्ब हिने निर्णायक एकेरीत विजय मिळवून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारतासमोर थायलंडचे आव्हान असेल. भारताने याआधी २०१६ आणि २०२० साली कांस्यपदकाची कमाई केली आहे.

पी. व्ही. सिंधू हिला अया ओहोरी हिच्याविरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूने पहिली लढत १३-२१, २०-२२ अशी गमावली. त्यानंतर दुहेरीचा सामना खेळताना ट्रिसा-गायत्री यांनी जगातील सहाव्या क्रमांकाच्या नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांचा २१-१७, १६-२१, २२-२० असा पराभव करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

माजी जागतिक विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध खेळताना भारताच्या अश्मिता हिने क्रॉस, ड्रॉप आणि उडी मारून स्मॅशेस लगावले. त्यामुळे तिने २१-१७, २१-१४ असा विजय मिळवत भारताची आघाडी २-१ अशी वाढवली. तनिषा क्रॅस्टो हिच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्यामुळे अश्विनी पोनप्पाच्या साथीला सिंधू उतरली. पण या जोडीला रेना मियाउरा आणि अयाको साकुरामोटो यांच्याकडून १४-२१, ११-२१ अशी हार पत्करावी लागली.

२-२ अशी बरोबरी असताना निर्णायक लढतीत अनमोल खर्ब हिने जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानी असलेल्या नात्सुकी निदायरा हिला २१-१४, २१-१८ असे हरवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in