Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामना दुबईत! आशिया चषक स्पर्धेची ठिकाणे जाहीर

यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे रंगणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) काही दिवसांपूर्वी जाहीर केले. तसेच स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर झाले होते. मात्र कोणती लढत कुठे होणार, हे निश्चित नव्हते. अखेरस रविवारी त्याविषयी घोषणा करण्यात आली. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित लढत १४ सप्टेंबरला दुबईत होणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

दुबई : यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे रंगणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) काही दिवसांपूर्वी जाहीर केले. तसेच स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर झाले होते. मात्र कोणती लढत कुठे होणार, हे निश्चित नव्हते. अखेरस रविवारी त्याविषयी घोषणा करण्यात आली. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित लढत १४ सप्टेंबरला दुबईत होणार आहे.

९ ते २८ सप्टेंबर या काळात आशिया चषक रंगणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.

मात्र भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार की नाही, याविषयी संभ्रम कायम आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला साखळी फेरीतील लढत दुबईत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध फार खराब असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अनेक नागरिकांचा बळी गेला. त्या निषेधार्थ भारताने लिजंड्स वर्ल्ड चॅम्पियनशीप लीगमध्ये (निवृत्त खेळाडूंची) पाकिस्तान संघाविरुद्ध दोन्ही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता बीसीसीआयवरही भारताच्या मुख्य संघाचे पाकिस्तानशी सामने आयोजित न करण्याबाबत चाहत्यांकडून दबाव टाकण्यात येत आहे. आयसीसी स्पर्धांमध्येच फक्त भारताने पाकिस्तानशी खेळावे, अशी मागणीही चाहते करत आहेत.

दरम्यान, आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत. गटातील अव्वल दोन संघ सुपर-फोर फेरी गाठतील. या फेरीतही भारत-पाकिस्तान आमनेसामने येऊ शकतात. अंतिम सामना दुबईत होईल.

भारतीय संघ कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जात नाही. आयसीसीने दोन्ही देशांत २०२७ पर्यंत त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा करार केला आहे. त्यामुळे बीसीसीआय आशिया चषकाचे यजमानपद भूषवत असली, तरी ही स्पर्धा करारानुसार यूएईत खेळवण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in