
मुंबई : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने तमाम भारतीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल व सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचेही भारताच्या टी-२० संघात पुनरागमन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. आगामी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी भारताचा संघ जाहीर करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने सलामीवीरांच्या स्थानासाठीच जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेसाठी रविवारी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला. आता मंगळवारी भारताच्या १५ खेळाडूंची निवड करण्यासाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समिती मुंबई येथे बीसीसीआयच्या मुख्यालयात भेटणार आहेत. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित असण्याची शक्यता आहे. मात्र बैठकीनंतर यावेळी पत्रकार परिषद होणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.
दरम्यान, ३१ वर्षीय वेगवान बुमरा इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पाचपैकी तीन सामने खेळला. वर्कलोड मॅनेजमेंट आणि पाठीवर येणारा ताण यामुळे बुमराला सामन्यांची योग्य निवड करण्याचे सुचवण्यात आले आहे. आशिया चषकाची अंतिम फेरी २८ सप्टेंबर रोजी असून २ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे बुमरा या आशिया चषकात न खेळण्याची शक्यता होती. मात्र बुमराने स्वतःच यासंबंधी निवड समितीशी चर्चा साधल्याचे समजते. आशिया चषकात बुमराला एका लढतीत ४ षटकेच गोलंदाजी करावी लागेल, त्यामुळे तो या स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यानेच याविषयी माहिती दिली.
दुसरीकडे भारतीय टी-२० संघात सलामीवीर म्हणून गेल्या वर्षभरापासून अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांना प्राधान्य दिले जात आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरची टी-२० मालिका खेळला. त्यावेळी हेच दोघे सलामीवीर होते व दोघांनीही छाप पाडली आहे. अशा स्थितीत गिल व यशस्वी यांचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. गिलचे एकदिवसीय व कसोटी प्रकारात भारतीय संघातील स्थान पक्के आहे, तर यशस्वी कसोटी संघात पहिल्या पसंतीचा सलामीवीर आहे. हे दोघेही भारतासाठी शेवटचा टी-२० सामना जुलै २०२४मध्ये खेळले आहेत.
त्यानंतर वाढत्या क्रिकेटमुळे संघ व्यवस्थापनाने या दोघांना प्रामुख्याने कसोटी व एकदिवसीय प्रकारासाठी राखून ठेवले व अभिषेक-सॅमसन यांना टी-२० संघात सलामीवीरांची भूमिका देण्यात आली. सॅमसनने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतके झळकावली. तोच संघाचा यष्टिरक्षकही आहे, तर अभिषेकने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावण्यासह गोलंदाजीतही चमक दाखवली. गेल्या १२ टी-२० सामन्यांपैकी ७ लढतींमध्ये या दोघांनी किमान ४०हून अधिक धावांची सलामी नोंदवली आहे. डावखुरा अभिषेक, तर जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या दोघांवरच विश्वास दर्शवून यशस्वी किंवा गिलपैकी एकाला पर्यायी खेळाडू म्हणून १५ जणांत संधी देऊ शकते.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल. एकंदर स्पर्धेतील १९ पैकी ११ सामने दुबईत, तर ८ लढती अबुधाबी येथे होणार आहेत.
तिघांचाही शेवटचा टी-२० सामना एक वर्षापूर्वी
बुमराने जून २०२४मध्ये टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफलातून गोलंदाजी केली होती. हाच त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा टी-२० सामना आहे. त्यानंतर आता एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर बुमरा टी-२० संघात परतण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गिल व यशस्वी ३० जुलै, २०२४ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अखेरचा टी-२० सामना खेळले. त्यानंतर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या संघांविरुद्ध भारताच्या टी-२० मालिका झाल्या. त्या मालिकांपासून अभिषेक-सॅमसन यांनी सलामीची सूत्रे स्वीकारली.
तिसऱ्या स्थानासाठी तिलक आणि श्रेयसमध्ये रस्सीखेच
तिलक वर्मा हा गेल्या वर्षभरापासून भारताच्या टी-२० संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. आफ्रिकेविरुद्ध त्याने दोन शतके झळकावली. तसेच इंग्लंडविरुद्धही चेन्नईत दडपणाखाली अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये तिलकला फारशी छाप पाडता आली नाही. त्याचवेळी श्रेयसने आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. तसेच १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यामुळे श्रेयसला टी-२० संघात स्थान द्यावे, अशीही मागणी चाहते करत आहेत. सूर्यकुमार चौथ्या, तर हार्दिक व अक्षर अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी खेळणार असल्याने श्रेयसला संधी दिली, तर तो तिसऱ्याच क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.
भारताचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव.