ट्रॉफीवरून खडाजंगी सुरूच! श्रीलंका, अफगाणिस्तानचा भारताला पाठिंबा; नक्वी मात्र निर्णयावर ठाम

भारताने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवून जवळपास महिना उलटला, तरीही या स्पर्धेतील ट्रॉफीवरून सुरू असलेला राडा अद्याप सुरूच आहे. मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट मंडळांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठिंबा दर्शवला.
ट्रॉफीवरून खडाजंगी सुरूच! श्रीलंका, अफगाणिस्तानचा भारताला पाठिंबा; नक्वी मात्र निर्णयावर ठाम
Published on

नवी दिल्ली: भारताने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवून जवळपास महिना उलटला, तरीही या स्पर्धेतील ट्रॉफीवरून सुरू असलेला राडा अद्याप सुरूच आहे. मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट मंडळांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठिंबा दर्शवला. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी त्यांच्या हस्तेच भारताला ट्रॉफी देण्यावर ठाम आहेत.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने २८ सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत केले. भारताने एकंदर नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली. मात्र भारताच्या विजयापेक्षा त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींची सगळीकडे अधिक चर्चा सुरू आहे. भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास मनाई केली. नक्वी हे पाकिस्तानचे मंत्री असून तेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्षही आहेत.

आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी न दिल्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त करताना नक्वी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत अध्यक्ष जय शहा यांच्यापुढे बीसीसीआय हे प्रकरण मांडणार असल्याचे समजते. अफगाणिस्तान व श्रीलंकन क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला पाठिंबा देताना त्यांना ट्रॉफी देण्यात यावी, असे मत नोंदवले आहे. मात्र नक्वी हे दुबईतच स्वहस्ते ट्रॉफी देऊ, यावर ठाम आहेत.

"बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला व आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य असलेल्या श्रीलंका व अफगाणिस्तान क्रिकेट मंडळांनी गेल्या आठवड्यात एसीसीला पत्र लिहिले आहे. यामध्ये ट्रॉफी भारताला लवकर देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले होते. मात्र यावर नक्वी यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बीसीसीआयच्या सदस्याने दुबईत येऊन ट्रॉफी स्वीकारावी, अशी नक्वी यांची मागणी आहे," असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयने असे कृत्य करण्यास नकार दिला आहे.

एसीसीने बीसीसीआयला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांनी भारतीय संघाच्या कृतीवर टीका केली आहे. अंतिम सामना झाल्यानंतर पारितोषिक वितरणाच्या वेळी भारतीय संघाने आपण नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही, असे सांगितले. त्यामुळे जवळपास ४० मिनिटे मंचावरील अतिथींचा खोळंबा झाला. भारतीय संघाने हे कृत्य टाळायला हवे होते, असेही एसीसीने मांडले आहे. त्यामुळे एकूणच हे प्रकरण आणखी काही काळ रंगणार आहे.

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विजेत्या संघाला चषक देण्यात आलेला नाही, असे मला वाटते. ही फारच अनाकलनीय गोष्ट असली, तरी माझ्यासाठी माझ्या संघाचा विजय, हीच खरी ट्रॉफी आहे, असे मत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले होते.

मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा बळी गेला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिले. मात्र तेव्हापासून भारताचे पाकिस्तानशी संबंध आणखी बिघडले. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यातही दोन्ही देश एकमेकांच्या देशात खेळण्यासाठी जात नाहीत.

वादाची पार्श्वभूमी

संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ३ वेळा आमनेसामने आले. तिन्ही लढतींमध्ये भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. तसेच अंतिम सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हातून चषकही स्वीकारला नाही. नक्वी बराच काळ मंचावर ताटकळत होते. त्यावेळी पाकिस्तानचा संघही मैदानात नव्हता, तर भारताचे खेळाडू मात्र मैदानातच बसून होते. अखेरीस एका तासाने पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला. भारताने वैयक्तिक पुरस्कार अन्य पदाधिकाऱ्यांच्या हातून घेतली. मात्र जेतेपदाचा चषक आपणच देणार, यावर नक्वी ठाम होते. शेवटी नक्वी अन्य कुणाच्या हातून भारताला चषक देण्यास तयार झाले नाही व ते चषक घेऊनच माघारी परतले. त्यामुळे भारताने स्वतःच चषकाच्या आभासी प्रतिकृतीसह जल्लोष केला.

logo
marathi.freepressjournal.in