भारतीय महिलांचा विजयारंभ! आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या लढतीत थायलंडचा ११-० असा धुव्वा

भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेत शानदार प्रारंभकेला. त्यांनी ब-गटातील साखळी सामन्यात थायलंडचा ११-० असा फडशा पाडला. सामनावीर मुमताज खान, उदिता दुहान आणि ब्युटी डुंगडुंग यांनी भारतासाठी प्रत्येकी दोन गोल नोंदवून विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारतीय महिलांचा विजयारंभ! आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या लढतीत थायलंडचा ११-० असा धुव्वा
Photo : X(SportsgramIndia)
Published on

हांगझो (चीन): भारतीय महिला हॉकी संघाने शुक्रवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेत शानदार प्रारंभकेला. त्यांनी ब-गटातील साखळी सामन्यात थायलंडचा ११-० असा फडशा पाडला. सामनावीर मुमताज खान, उदिता दुहान आणि ब्युटी डुंगडुंग यांनी भारतासाठी प्रत्येकी दोन गोल नोंदवून विजयात मोलाची भूमिका बजावली.

एकीकडे बिहारमध्ये पुरुषांची हॉकी स्पर्धा सुरू असतानाच हांगझो (चीन) येथे महिलांची आशिया चषक हॉकी स्पर्धा शुक्रवारपासून सुरू झाली. ब-गटात भारत, थायलंड, जपान, सिंगापूरचा समावेश आहे. तसेच अ-गटात चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया व चायनीज तैपई हे संघ आहेत. चीननंतर भारतीय संघ या स्पर्धेत क्रमवारीत वरच्या स्थानी आहे. या स्पर्धेतील विजेता २०२६च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर लक्ष असेल.

गोलरक्षक सविता आशिया पुनिया व ड्रॅगफ्लिकर यांच्या दीपिका अनुपस्थितीत सलिमा टेटे भारताचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या भारतीय महिलांनी शुक्रवारी सुरुवातीपासूनच आक्रमण केले.

मुमताजने सातव्या मिनिटाला भारताचे गोलखाते उघडले. लगेचच संगीता कुमारीने त्यामध्ये पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून आणखी भर टाकली. मग नवनीत कौर व लालरेमसियामी यांनी अनुक्रमे १६ व १८व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताची आघाडी ४-० अशी वाढवली. उदिताने ३० व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला व संघासाठी पाचवा गोल नोंदवला. त्यामुळे मध्यांतराला भारताकडे ५-० अशी भक्कम आघाडी होती.

दुसऱ्या सत्रातही भारताचे वर्चस्व कायम राहिले. ब्युटीने ४५व्या मिनिटाला भारतासाठी सहावा गोल केला. मग मुमताजने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवताना संघाचे गोलसप्तक साकारले. पाच मिनिटांतच अनुक्रमे उदिता व ब्युटी यांनीदेखील आपापला सामन्यातील दुसरा गोल झळकावला. शर्मिला देवीने मग ५७व्या मिनिटाला भारताची गोलसंख्या १०वर नेली. तर अखेरच्या म्हणजेच ६०व्या मिनिटाला ऋतुजा पिसाळने ११वा गोल नोंदवून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

भारताने संपूर्ण लढतीत एकूण ९ पेनल्टी कॉर्नर मिळवताना त्यापैकी ५ वर गोल केले. तसेच थायलंडला एकही कॉर्नर मिळू दिला नाही. मुमताजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता शनिवारी भारताची दुसऱ्या साखळी सामन्यात जपानशी गाठ पडणार आहे. दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ सुपर-फोर फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. मग सुपर-फोर फेरीतील दोन संघ थेट अंतिम फेरीत खेळतील. १४ सप्टेंबरला अंतिम फेरी रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in