Asia Cup 2025 : पाकिस्तानचा विजय; श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात

हुसैन तलतच्या नाबाद ३२ धावा व २ बळी आणि मोहम्मद नवाझच्या नाबाद ३८ धावांच्या जोरावर पाकिस्तानने आशिया चषकात श्रीलंकेवर ५ गडी व १२ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने सुपर-फोर फेरीत पहिला विजय नोंदवला, तर श्रीलंकेचे आव्हान संपले.
Asia Cup 2025 : पाकिस्तानचा विजय; श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात
Photo : X
Published on

अबूधाबी : हुसैन तलत (३० चेंडूंत नाबाद ३२ धावा व २ बळी) व मोहम्मद नवाझ (२४ चेंडूंत नाबाद ३८) यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाच्या बळावर पाकिस्तानने मंगळवारी रात्री आशिया चषकात श्रीलंकेवर ५ गडी व १२ चेंडू राखून मात केली. या विजयासह पाकिस्तानने सुपर-फोर फेरीत पहिला विजय नोंदवला, तर श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ८ बाद १३३ धावा केल्या. कामिंदू मेंडिसने ४४ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. मात्र कुशल मेंडिस (०), कुशल परेरा (१५), पथुम निसांका (८) यांनी निराशा केली. शाहीन आफ्रिदीने ३, तर हुसैन व हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघही एकवेळ ५ बाद ८० अशा स्थितीत होता. फखर झमान (१७), सैम अयूब (२), कर्णधार सलमान अली (५) लवकर बाद झाले. मात्र हुसैन व नवाझ यांनी सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची निर्णायक भागीदारी रचून संघाचा १८ षटकांत विजय साकारला. हुसैन सामनावीर ठरला. पाकिस्तानने आता दोन सामन्यांत दोन गुण आहेत, तर सलग दोन पराभव पत्करणारा श्रीलंकेचा संघ तळाशी आहे. आता बांगलादेश-पाकिस्तान यांच्यात गुरुवारी, भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारी लढत होईल. रविवारी अंतिम सामना रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in