Asia Cup 2025 : सुपरफास्ट विजयाद्वारे इशारा! यूएईविरुद्धच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमारचे मत

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई संघाविरुद्ध मिळवलेल्या सुपरफास्ट विजयाद्वारे आम्ही आमची तयारी कितपत झाली आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे येणाऱ्या सामन्यातही याच विश्वास व आक्रमकतेसह खेळू, असे मत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
Asia Cup 2025 : सुपरफास्ट विजयाद्वारे इशारा! यूएईविरुद्धच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमारचे मत
Photo : X
Published on

दुबई : संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई संघाविरुद्ध मिळवलेल्या सुपरफास्ट विजयाद्वारे आम्ही आमची तयारी कितपत झाली आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे येणाऱ्या सामन्यातही याच विश्वास व आक्रमकतेसह खेळू, असे मत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

भारतीय संघाने बुधवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्याच्या थाटात खेळ केला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने (७ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे यूएईचे फलंदाज ढेपाळले. त्यामुळे त्यांचा संघ १३.१ षटकांत ५७ धावांत गारद झाला. भारताने अवघ्या ४.३ षटकांत हे लक्ष्य गाठून ९ गडी व ९३ चेंडू राखून शानदार विजय नोंदवला. लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१६ चेंडूंत ३०) व शुभमन गिल (९ चेंडूंत नाबाद २०) यांनी ४८ धावांची सलामी नोंदवली. सूर्यकुमारने २ चेंडूंत नाबाद ७ धावा केल्या.

“चॅम्पियन्स ट्रॉफीत आपल्या संघातील बहुतांश खेळाडू या खेळपट्ट्यांवर खेळले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या अनुभवाचा योग्य लाभ उचलला. आम्ही गोलंदाजी स्वीकारून खेळपट्टी कशी असेल, याचा आढावा घेणार होतो. मात्र इतक्या लवकर गोलंदाज वर्चस्व मिळवतील, असे वाटले नव्हते. त्यांना या विजयाचे श्रेय जाते,” असे सूर्यकुमार म्हणाला.

“कुलदीपने अप्रतिम मारा केला. त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिली. आशिया चषकाची याहून धडाकेबाज सुरुवात होऊ शकत नाही. त्यामुळे पुढील सामन्यांमध्येही आम्ही याच आत्मविश्वासाने मैदानात उतरू,” असेही सूर्यकुमारने सांगितले.

दरम्यान, आशिया चषकाच्या १७व्या पर्वाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर-फोर फेरी गाठतील. मग सुपर-फोर फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीत खेळतील.

हे मुद्दे महत्त्वाचे!

  • भारताने टी-२० प्रकारात प्रथमच २७ चेंडूंत एखादा सामना जिंकला. भारताने तब्बल ९३ चेंडू राखून ही लढत जिंकली. यापूर्वी स्कॉटलंडविरुद्ध २०२१मध्ये भारताने ८१ चेंडूंच्या फरकाने विजय मिळवला होता.

  • भारताविरुद्ध टी-२० सामन्यात प्रथमच एखादा संघ ५७ धावांत गारद झाला. यापूर्वी २०२३मध्ये भारताने न्यूझीलंडला ६६ धावांत गुंडाळले होते. तसेच हा सामना एकंदर १७.४ षटकांत संपला. १३.१ षटकांत यूएई गारद झाल्यावर भारताने ४.३ षटकात विजय मिळवला.

  • कुलदीपने टी-२० प्रकारात चौथ्यांदा एका सामन्यात चार बळी मिळवले. आता फक्त भुवनेश्वर कुमार (५ वेळा) त्याच्यापुढे आहे.

  • भारताने १५ सामन्यांनंतर नाणेफेक जिंकली. यापूर्वी जानेवारीत राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताच्या कर्णधाराने अखेरची नाणेफेक जिंकली होती.

logo
marathi.freepressjournal.in