Asia Cup 2025 : यूएईच्या विजयाचा भारताला फायदा; अफगाणिस्तान-बांगलादेशमध्ये आज द्वंद्व

आशिया चषकात सोमवारी दुपारी झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने ओमानला ४२ धावांनी नमवले. यासह यूएईने अ-गटात गुणांचे खाते उघडताना तिसरे स्थान मिळवले. यूएईच्या विजयामुळे भारताचे सुपर-फोर फेरीतील स्थान पक्के झाले.
Asia Cup 2025 : यूएईच्या विजयाचा भारताला फायदा; अफगाणिस्तान-बांगलादेशमध्ये आज द्वंद्व
Photo : X (@ACCMedia1)
Published on

अबुधाबी : आशिया चषकात सोमवारी दुपारी झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने ओमानला ४२ धावांनी नमवले. यासह यूएईने अ-गटात गुणांचे खाते उघडताना तिसरे स्थान मिळवले. यूएईच्या विजयामुळे भारताचे सुपर-फोर फेरीतील स्थान पक्के झाले.

प्रथम फलंदाजी करताना यूएईच्या संघाने २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद वासिमने ५४ चेंडूंत ६९ धावा केल्या. त्याला आलिशान शरफू (५१) व मोहम्मद झोएब (२१) यांची सुरेख साथ लाभली. जितेनने दोन बळी मिळवले. त्यानंतर यूएईचा वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दीकीने ४ बळी मिळवून ओमानला १८.४ षटकांत १३० धावांत गुंडाळले. हैदर अली व मोहम्मद जवादुल्ला यांनी प्रत्येकी २ गडी टिपले. आर्यन बिश्तने ओमानकडून सर्वाधिक २४ धावा केल्या. ७ चौकार व १ षटकारासह ३८ चेंडूंत ५१ धावा करणाऱ्या शरफूला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

यूएईचे आता २ सामन्यांत २ गुण आहेत, तर पाकिस्तानसुद्धा तितक्याच गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे सुपर-फोर फेरीतील स्थान पक्के झाले असून पाकिस्तान आणि यूएई यांच्यात १७ तारखेला होणाऱ्या लढतीद्वारे अ-गटातील दुसरा संघ ठरेल. भारताचे २ सामन्यांत सर्वाधिक ४ गुण आहेत. त्यांची शुक्रवारी ओमानशी गाठ पडेल. ओमानचे सलग दोन पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

अफगाणिस्तान-बांगलादेशमध्ये आज द्वंद्व

अबुधाबी : आशिया चषक स्पर्धेत मंगळवारी ब-गटात अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आमनेसामने येतील. अफगाणिस्तानने पहिल्या लढतीत हाँगकाँगला धूळ चारली, तर बांगलादेशने हाँगकाँगला नमवल्यानंतर त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बांगलादेशसाठी ही अखेरची साखळी लढत असून त्यांना विजय अनिवार्य आहे. अबूधाबी येथे ही लढत होणार असून येथे फिरकीपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

नवीन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी अब्दुल्ला अहमदझाईला संघात स्थान देण्यात आले आहे. २५ वर्षीय नवीनला खांद्याच्या दुखापतीने गेल्या काही महिन्यांपासून सतावले आहे. मात्र तरी त्याला राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in