आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा:भारताला तिरंदाजीत ४ पदके

आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा:भारताला तिरंदाजीत ४ पदके

वैयक्तिक प्रकारात, तीन वेळा ऑलिम्पियन ठरलेली दीपिका कुमारी आणि सिमरनजीत कौर यांच्यात महिलांच्या गटातील अंतिम फेरी होईल.

बघदाद : भारतीय तिरंदाजांनी दमदार कामगिरी करत आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कम्पाऊंड प्रकारात तीन सुवर्णपदकांसह चार पदकांची कमाई केली. त्याचबरोबर रविवारी भारतीय तिरंदाजांनी किमान १० पदके निश्चित केली आहेत.

पुरुष, महिला आणि मिश्र कम्पाऊंड प्रकारात भारतीय संघांनी तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले. या तिन्ही प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताने इराणला धूळ चारली. महिलांच्या अंतिम फेरीत भारताने इराणवर २२३-२१९ असा विजय साकारला. पुरुषांमध्ये भारताने २३२-२२९ अशी बाजी मारली. तर मिश्र कम्पाऊंड प्रकारात भारतीय संघ १५९-१५७ अशा गुणांसह विजेता ठरला.

विद्यमान जगज्जेती आदिती स्वामी हिने महिलांच्या एकेरी कम्पाउंड प्रकारात कांस्यपदकावर मोहोर उमटवली. तिने आपलीच सहकारी प्रिया गुर्जर हिचा १४८-१४५ असा पराभव केला. रिकर्व्ह मिश्र आणि पुरुष सांघिक प्रकारात भारतीय संघाला सुवर्णपदकासाठीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागेल. तर महिलांच्या गटात भारताची अंतिम लढत उझबेकिस्तानशी होईल.

वैयक्तिक प्रकारात, तीन वेळा ऑलिम्पियन ठरलेली दीपिका कुमारी आणि सिमरनजीत कौर यांच्यात महिलांच्या गटातील अंतिम फेरी होईल. तरुणदीप राय याला पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकासाठी धीरम बोम्मादेवारा याच्याशी झुंज द्यावी लागेल. कम्पाऊंड वैयक्तिक प्रकारात, कुशल ददाल आणि प्रथमेश जावकार हे पुरुषांच्या गटात सुवर्णपदकासाठी लढतीत. प्रणीत कौर हिची अंतिम लढत इराणच्या फातेमे हेम्माती हिच्याशी होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in