सलग दुसऱ्या विजयाचे भारतीय महिलांचे ध्येय! आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज संयुक्त अरब अमिरातीशी गाठ

Asia Cup Cricket Tournament: भारताची रविवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) संघाशी गाठ पडणार आहे.
सलग दुसऱ्या विजयाचे भारतीय महिलांचे ध्येय! आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज संयुक्त अरब अमिरातीशी गाठ
PTI
Published on

दाम्बुला : महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. भारताची रविवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) संघाशी गाठ पडणार आहे.

श्रीलंकेत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत जेतेपद मिळवून तब्बल आठव्यांदा जेतेपद पटकावण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. बांगलादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान महिलांचा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे. गेल्या चार हंगांमांपासून टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून सातव्यांदा जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, तर ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यांपैकी फक्त २०१८मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अन्यथा प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे.

१९ ते २८ जुलैदरम्यान ८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे दोन गट करण्यात आले आहे. भारताच्या गटात पाकिस्तानसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. अन्य गटात श्रीलंका, बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने दाम्बुला येथील एकाच स्टेडियमवर होतील. २६ जुलै रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २८ तारखेला अंतिम सामना खेळवण्यात येईल. दरम्यान, भारताने पहिल्या लढतीत पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. आता रविवारी विजय मिळवून भारताला सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारण्याची उत्तम संधी आहे. अमिरातीने मात्र नेपाळकडून सलामीची लढत गमावली. त्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

स्मृती, जेमिमाच्या कामगिरीकडे लक्ष

भारतीय फलंदाजांची भिस्त प्रामुख्याने डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर असेल. विशेषत: स्मृती सध्या भन्नाट फॉर्मात आहे. तसेच शफाली वर्मा, हरमनप्रीत, दीप्ती शर्मा, रिचा घोष अशी फलंदाजी भारताच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत पूजा वस्त्रकार लयीत असल्याने ती व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. आशा शोबना, श्रेयांका पाटील, राधा यादव यांचे फिरकी त्रिकुटही भारताकडे उपलब्ध आहे. दीप्तीचे अष्टपैलू योगदान भारताच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.

महिला संघही लवकरच आयसीसी स्पर्धा जिंकेल!

भारतीय पुरुष संघालाही आयसीसी जेतेपदासाठी जवळपास ११ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे भारताचा महिला संघही लवकरच आयसीसी स्पर्धा जिंकेल, असे मत भारताची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने नोंदवले. भारताला २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. तसेच २०२०च्या टी-२० विश्वचषकातही भारताला उपिविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२२च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला.

> भारताने ७ वेळा आशिया चषक जिंकलेला आहे. फक्त २०१८मध्ये अंतिम फेरीत बांगलादेशने भारताला नमवले होते.

भारताचा संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, उमा छेत्री, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलता, आशा शोबना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजीवन सजना. राखीव खेळाडू : श्वेता सेहरावत, साईका इशाक, तनुजा कन्वर, मेघना सिंग.

  • वेळ : दुपारी २ वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in