
राजगिर (बिहार) : भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत मलेशियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. या विजयामुळे भारताने सुपर-फोर फेरीत ४ गुणांसह अग्रस्थान (१ बरोबरी, १ विजय) मिळवले असून अंतिम फेरीसाठी जोरदार दावेदारी सादर केली आहे. आता ६ सप्टेंबरला चीनविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या लढतीत त्यांना बरोबरीसुद्धा अंतिम फेरी गाठण्यासाठी पुरेशी ठरणार आहे.
२९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतीय हॉकी महासंघातर्फे बिहार येथील राजगिर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अ-गटातून भारत, चीन, तर ब-गटातून मलेशिया व कोरिया यांनी आगेकूच केली. या स्पर्धेचा विजेता २०२६च्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळताना भारताने साखळी फेरीत सलग तीन विजय नोंदवून दिमाखात सुपर-फोर फेरी गाठली. मग बुधवारी सुपर-फोर फेरीच्या पहिल्या लढतीत भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. स्पर्धेत आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक ७ गोल करणाऱ्या हरमनप्रीतसह भारताच्या शिलेदारांना गुरुवारी मलेशियाविरुद्ध विजय आवश्यक होता. त्यांनी त्याचप्रमाणे खेळ केला.
राजगिर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या लढतीत मलेशियाच्या शफिक हसनने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून भारताला धक्का दिला. मात्र यातून लगेच सावरत भारताने मलेशियावर सातत्याने आक्रमण केले. १७व्या मिनिटाला मनप्रीत सिंगने भारताला बरोबरी साधून दिली, तर १९व्या मिनिटाला सुखजीत सिंगने भारताची आघाडी वाढवली.
हे कमी म्हणून की काय पाच मिनिटांत (२४वे मिनिट) शिलानंद लाक्राने भारतासाठी तिसरा गोल झळकावला. ७ मिनिटांच्या अंतरात भारताने केलेल्या तीन गोलमुळे मलेशियाचा बचाव पूर्णपणे कोलमडला. मध्यांतरापर्यंत भारताकडे ३-१ अशी आघाडी होती. मग मध्यांतरानंतर विवेक प्रसादने ३८व्या मिनिटाला भारतासाठी चौथा गोल नोंदवून विजय पक्का केला. मलेशियाने उर्वरित वेळेत पिछाडी भरून काढण्यासाठी फार प्रयत्न केले. मात्र ते भारताचा बचाव भेदू शकले नाहीत.
अंतिम फेरीचे समीकरण
-भारतीय संघ तूर्तास सुपर-फोर फेरीत ४ गुणांसह अग्रस्थानी असून त्यांची अखेरची लढत ६ तारखेला चीनविरुद्ध होईल. चीनने गुरुवारी अन्य लढतीत कोरियाला धूळ चारल्याने ते २ सामन्यांतील ३ गुणांसह (१ पराभव, १ विजय) दुसऱ्या स्थानी आहेत. चीनने भारताला नमवले, तर ते ६ गुणांसह अंतिम फेरी गाठतील. मात्र भारताने चीनला हरवले तर ७ गुणांसह, किंवा बरोबरीत रोखले तर ५ गुणांसहसुद्धा भारताचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.
-तिसऱ्या क्रमांकावरील मलेशिया (३ गुण) व कोरिया (१ गुण) यांच्यातही शनिवारी लढत होईल. भारताने चीनकडून पराभव पत्करला, तर मलेशिया व कोरिया लढत बरोबरीत सुटावी, यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. मात्र मलेशिया अथवा कोरियापैकी एकानेही विजय मिळवला, तरी भारताला चीनला किमान बरोबरीत रोखणे गरजेचे आहे.
महिलांचा आशिया चषक आजपासून
एकीकडे बिहारमध्ये पुरुषांची स्पर्धा सुरू असतानाच हांगझो (चीन) येथे महिलांची आशिया चषक हॉकी स्पर्धा शुक्रवार, ५ सप्टेंबरपासून सुरू होईल. ब-गटात भारताचा संघ थायलंडविरुद्धच्या लढतीने अभिनयाला प्रारंभ करेल. त्यानंतर जपान, सिंगापूरशी भारताचे सामने होतील. अ-गटात चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया व चायनीज तैपई हे संघ आहेत. चीननंतर भारतीय संघ या स्पर्धेत क्रमवारीत वरच्या स्थानी आहे. या स्पर्धेतील विजेतासुद्धा विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर लक्ष असेल. गोलरक्षक सविता पुनिया व दीपिका यांच्या अनुपस्थितीत सलिमा टेटे भारताचे नेतृत्व करणार आहे.