भारताच्या विजयात महाराष्ट्राच्या मुलींची चमक; सुपर-फोर फेरीत दक्षिण कोरियावर ४-२ अशी मात; आज चीनशी मुकाबला

वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ या महाराष्ट्रातील खेळाडूंनी दिलेल्या योगदानाच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दमदार विजय नोंदवला. त्यांनी आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सुपर-फोर फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-२ असा पराभव केला.
भारताच्या विजयात महाराष्ट्राच्या मुलींची चमक; सुपर-फोर फेरीत दक्षिण कोरियावर ४-२ अशी मात; आज चीनशी मुकाबला
Photo : X
Published on

हांगझो (चीन) : वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ या महाराष्ट्रातील खेळाडूंनी दिलेल्या योगदानाच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दमदार विजय नोंदवला. त्यांनी आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सुपर-फोर फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-२ असा पराभव केला.

एकीकडे बिहारमध्ये भारतीय पुरुषांनी आशिया चषक उंचावल्यावर आता चीनमध्ये भारतीय महिलासुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील, अशी आशा आहे. या स्पर्धेच्या ब-गटात भारत, थायलंड, जपान, सिंगापूरचा समावेश होता, तर अ-गटात चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया व चायनीज तैपई हे संघ होते. चीननंतर भारतीय संघ या स्पर्धेत क्रमवारीत वरच्या स्थानी आहे. या स्पर्धेतील विजेता २०२६च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. सलिमा टेटे भारताचे नेतृत्व करत असून हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघ खेळत आहे.

दरम्यान, भारताने साखळी फेरीत अग्रस्थान मिळवताना थायलंड व सिंगापूर यांचा धुव्वा उडवला. तसेच जपानला २-२ असे बरोबरीत रोखले होते. भारताने ब-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केल्यावर बुधवारी त्यांची सुपर-फोर फेरीत कोरियाशी गाठ पडली. मात्र भारताने पहिल्या मिनिटापासूनच लढतीवर वर्चस्व गाजवले.

२१ वर्षीय वैष्णवीने दुसऱ्याच मिनिटाला भारतासाठी गोल नोंदवला. मध्यांतरापर्यंत ही आघाडी भारताने कायम राखली. मग संगीता कुमारीने ३३व्या मिनिटाला भारताची आघाडी २-० अशी वाढवली. मात्र किम युजिनने लगेगच कोरियासाठी पहिला गोल केला. ४०व्या मिनिटाला लालरेमसियामीने भारतासाठी तिसरा गोल केला. ५३व्या मिनिटाला किमने आणखी एक गोल नोंदवून कोरियाच्या आशा कायम राखल्या. मात्र ५९व्या मिनिटाला ऋतुजाने चौथा गोल झळकावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

आता सुपर-फोर गटात भारत ३ गुणांसह अग्रस्थानी असून गुरुवारी त्यांची चीनशी निर्णायक लढत होईल. चीनने बुधवारी अन्य लढतीत जपानला २-० असे नमवले. तसेच त्यांनी गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली होती. त्यामु‌ळे भारत-चीन या लढतीतील विजेता अंतिम फेरीतील स्थान जवळपास पक्के करेल, असे म्हणू शकतो.

साखळी फेरीत भारताने ब-गटात ३ सामन्यांतील २ विजय व १ बरोबरीसह ७ गुण मिळवले. जपाननेसुद्धा इतक्याच गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. भारताने जपानच्या तुलनेत अधिक गोल झळकावल्याने त्यांनी अग्रस्थान पटकावले. अ-गटातून चीन व दक्षिण कोरिया यांनी सुपर-फोर फेरी गाठली. त्यामुळे आता स्पर्धेतील थरार आणखी वाढला असून भारतीय संघातील खेळाडूंचा कस लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in