Asia Cup Hockey : मंदीपच्या निर्णायक गोलमुळे भारताने कोरियाला बरोबरीत रोखले

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत सुपर-फोर फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झालेल्या या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंचा कस लागला.
Asia Cup Hockey : मंदीपच्या निर्णायक गोलमुळे भारताने कोरियाला बरोबरीत रोखले
Photo: X (@Media_SAI)
Published on

राजगिर (बिहार) : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत सुपर-फोर फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झालेल्या या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंचा कस लागला.

२९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतीय हॉकी महासंघातर्फे बिहार येथील राजगिर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ८ संघांचा समावेश असून भारत, चीन, जपान व कझाकस्तान अ-गटात, तर बांगलादेश, चायनीज तैपई, मलेशिया व दक्षिण कोरिया ब-गटात आहेत. त्यांपैकी अ-गटातून भारत, चीन, तर ब-गटातून मलेशिया व कोरिया यांनी आगेकूच केली.

हॉकीच्या आशिया चषकाचे हे १२वे पर्व असून भारत २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असून दक्षिण कोरियाने सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवले आहे. क्रेग फुल्टन हे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. भारत या स्पर्धेत विजेतेपद मिळवेल, अशी आशा आहे. या स्पर्धेचा विजेता २०२६च्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.

भारताने साखळी गटात विजयी हॅटट्रिक नोंदवताना अनुक्रमे चीन, जपान व कझाकस्तानला धूळ चारली. मात्र बुधवारी सुपर-फोर फेरीतील पहिल्या लढतीत भारताला संघर्ष करावा लागला. हार्दिक सिंगने आठव्याच मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. मात्र यँग जि-हूनने १२ व १४व्या मिनिटाला गोल नोंदवून कोरियाला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रापर्यंत त्यांची आघाडी कायम होती.

त्याशिवाय भारताने तब्बल सहा वेळा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. त्यामुळे कोरिया बाजी मारणार असे वाटत होते. मात्र मंदीप सिंगने ५३व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे भारताने २-२ अशी बरोबरी साधली. मग उर्वरित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला व दोघांनाही प्रत्येकी एक गुण देण्यात आला. अन्य सामन्यात मलेशियाने चीनला हरवल्याने ते सध्या सुपर-फोर फेरीत ३ गुणांसह आघाडीवर आहेत. सुपर-फोर फेरीतील आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताची गुरुवारी मलेशियाशी गाठ पडणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in