राजगिर (बिहार) : कर्णधार हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारतीय पुरुष संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रविवारी भारताने जपानचा ३-२ असा पराभव करून अ-गटातून अग्रस्थानासह सुपर-फोर फेरीत प्रवेश केला.
यंदा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतीय हॉकी महासंघातर्फे बिहार येथील राजगिर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ८ संघांचा समावेश असून भारत, चीन, जपान व कझाकस्तान अ-गटात, तर बांगलादेश, चायनीज तैपई, मलेशिया व दक्षिण कोरिया ब-गटात आहेत. हॉकीच्या आशिया चषकाचे हे १२वे पर्व असून भारत २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असून दक्षिण कोरियाने सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवले आहे. क्रेग फुल्टन हे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. भारत या स्पर्धेत विजेतेपद मिळवेल, अशी आशा आहे. या स्पर्धेचा विजेता २०२६च्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
दोन दिवसांपूर्वी अ-गटातील पहिल्या सामन्यात भारताला चीनने विजयासाठी झुंजवले. चीनकडून दु शियाओने १२व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र जुगराज सिंगने १८व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर २०व्या मिनिटाला हरमनप्रीतने भारताची आघाडी २-१ अशी वाढवली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी राखली.
तिसऱ्या सत्रात चेन बेन्हाई (३५) व जेनहेंग (४१) यांनी चीनकडून दोन गोल नोंदवले. तर हरमनप्रीतने ३३व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला. त्यामुळे सामना ३-३ असा बरोबरीत होता. मात्र ४७व्या मिनिटाला हरमनप्रीतने निर्णायक चौथा गोल झळकावून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र या सामन्यातील विजयानंतरही प्रशिक्षक फुल्टन समाधानी नव्हते. यापुढील लढतींमध्ये भारताला कामगिरी उंचवावी लागेल, असे ते म्हणाले. हरमनप्रीतने या सामन्यात एक पेनल्टी स्ट्रोकही गमावला. तसेच मध्यंतरानंतर भारताचे खेळाडू काहीसे सुस्तावलेले दिसले.
रविवारी जपानविरुद्ध मात्र भारताने पूर्ण ताकदीने खेळ केला. मंदीप सिंगने चौथ्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर हरमनप्रीतने पाचव्या मिनिटाला भारताची आघाडी २-० अशी केली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र ३८व्या मिनिटाला कोसी कावाबेने जपानसाठी पहिला गोल केला. त्यानंतर ४६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा व स्पर्धेतील एकंदर चौथा गोल नोंदवून भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली. ५९व्या मिनिटाला कावाबेने आणखी एक गोल नोंदवून सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु उर्वरित एका मिनिटात त्यांना बरोबरी साधता आली नाही आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
दोन सामन्यांतील दोन विजयांसह भारतीय संघ तूर्तास सहा गुणांसह गटात अग्रस्थानी आहे. २ सप्टेंबरला भारताची कझाकस्तानशी गाठ पडेल. त्यांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. अ-गटातून दुसऱ्या स्थानासाठी चीन व जपान यांच्यात चुरस आहे. ब-गटातून मलेशियाने आगेकूच केली आहे. दोन्ही गटातूंन आघाडीचे दोन संघ सुपर-फोर फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
दरम्यान, एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील लढती अन्य ठिकाणी खेळवण्यात येतील. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या आशिया चषकातून माघार घेतली आहे. तसेच उभय देशांना एकमेकांच्या राष्ट्रात जाऊन खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान अन्य देशांत आमनेसामने येतील.