

जालंधर : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि पाच वेळचा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता भारतीय हॉकी संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सहा देशांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत असून यजमान भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तब्बल १७ वर्षांनंतर पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय हॉकीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबने अनेक दिग्गज खेळाडू देशाला दिले आहेत. आजही भारतीय संघातील निम्म्याहून अधिक खेळाडू या राज्यातील आहेत. मात्र, पंजाबमध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा २००९ मध्ये गोल्ड कपच्या (सुवर्ण चषक) रूपाने झाली होती.
आता कर्णधार हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, जर्मनप्रीत सिंग, राजिंदर सिंग, हार्दिक सिंग, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग आणि मंदीप सिंग यांना मायभूमीत कुटुंबीय आणि चाहत्यांसमोर खेळण्याची संधी मिळणार आहे. घरच्यांची उपस्थिती आपल्यासाठी भावनिक क्षण असेल, असे हरमनप्रीतने यापूर्वी सांगितले आहे. मात्र, सरावादरम्यान दुखापत झाल्याने अनुभवी मनप्रीत सिंग स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी विवेक सागर प्रसादचा संघात समावेश करण्यात आला आहे.
पंजाबने बलबीर सिंग सीनियर, उधम सिंग कुलार, पृथिपाल सिंग, अजित पाल सिंग, सुरजीत सिंग रंधावा आणि परगट सिंग यांसारखे दिग्गज खेळाडू घडवले आहेत. जालंधरजवळील संसारपूर गावाला भारतीय हॉकीची ‘मक्का’ मानले जाते. या गावाने १४ ऑलिम्पिकपटूंसह सुमारे ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत.
पाकिस्तानच्या अनुपस्थितीत मलेशिया हा भारतासाठी सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाला ५-१ असे हरवले होते; मात्र त्यांना कमी लेखणे धोकादायक ठरू शकते. जपाननेही अलीकडील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला चांगली झुंज दिली होती.
मंदीप, जर्मनप्रीत, अमित आणि निलकांत यांच्यासाठी ही स्पर्धा भावनिक ठरण्याची शक्यता आहे. या चौघांची ही देशासाठी अखेरची स्पर्धा ठरू शकते.
हे नक्की वाचा!
* जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या भारताने २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकने मोहिथ एच. एस. याची जागा घेतली आहे, तर युवा बचावपटू अमनदीप लाक्रा आणि मध्यफळीतील आदित्य लालागे यांना संधी मिळाली आहे.
* पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतल्याने बांगलादेशला संधी मिळाली आहे. भारताचे पुढील सामने चीन (२९ ऑक्टोबर), जपान (३० ऑक्टोबर), मलेशिया (१ नोव्हेंबर) आणि कोरिया (२ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध होतील. साखळी फेरीतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरी आणि अंतिम सामना ४ व ५ नोव्हेंबरला मोहाली येथे होईल.