आशियाई अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाचे पदक सुनिश्चित ; उपांत्य फेरीत धडक

दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या भारतीय संघाने सिंगापूरचा ३-० असा धुव्वा उडवला.
आशियाई अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाचे पदक सुनिश्चित ; उपांत्य फेरीत धडक
Published on

नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघाने सोमवारी आशियाई अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याबरोबरच त्यांनी भारतासाठी पदक सुनिश्चित करण्याचा पराक्रम केला. बुधवारी त्यांची चायनीज तैपईशी गाठ पडणार आहे.

दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक प्रकारात अनुभवी शरथ कमल, जी. साथियान, हरमीत देसाई यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सिंगापूरचा ३-० असा धुव्वा उडवला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघालाही कांस्यपदकाने गौरवण्यात येते. त्यामुळे भारतीय संघाचे किमान पदक पक्के झाले असून ते सुवर्णपदकासह मायदेशी परततील, अशी आशा चाहते बाळगून आहेत.

एकेरीच्या पहिल्या सामन्यात ४१ वर्षीय शरथने आयझॅक क्वेकवर ११-१, १०-१२, ११-८, ११-१३, १४-१२ अशी पाच गेममध्ये मात केली. त्यानंतर साथियानने कीन पांगवर ११-६, ११-८, १२-१० असे सरळ तीन गेममध्ये वर्चस्व गाजवले. अखेरच्या एकेरीच्या लढतीत हरमीतने झे यू क्लारेन्सवर ११-९, ११-४, ११-६ असे प्रभुत्व मिळवून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. दोन वर्षांपूर्वी दोहा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुषांनी कांस्यपदक कमावले होते.

महिला संघाचा पराभव

महिलांच्या सांघिक प्रकारात भारताला जपानकडून ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. मिमाने अहिका मुखर्जीला ११-७, १५-१३, ११-८ असे नामोहरम केले. मग अनुभवी मनिका बत्राला हिना हयाटाने ७-११, ९-११, ११-९, ३-११ असे चार गेममध्ये नमवले. मियू हिराना हिने सुतिर्था मुखर्जीवर ७-११, ११-४, ११-६, ११-५ अशी मात करून जपानला ३-० असा विजय मिळवून दिला.

logo
marathi.freepressjournal.in