Asian Games 2023 : भारत आणखी एका सुवर्ण पदकाचा मानकरी ; रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने रचला इतिहास

भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं
Asian Games 2023 : भारत आणखी एका सुवर्ण पदकाचा मानकरी ; रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने रचला इतिहास

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीने शनिवारी मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या जोडीचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेने रचलेल्या या इतिहासाबद्दल तिचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे.

रोहन आणि ऋतुजा या भारतीय जोडीने अंतिम फेरीत अन शुओ लियांग आणि त्सुंग हाओ हुआंग या जोडीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. भारतीय जोडीने हा सामना 2-6, 6-3, (10-4) असा जिंकला. चायनीज तैपेईच्या जोडीने भारतीय जोडीला चुरशीची टक्कर दिली. मात्र, टायब्रेकरमध्ये भारताने बाजी मारली. रोहन बोपण्णाची ही कदाचित शेवटची आशियाई स्पर्धा आहे. एकप्रकारे त्याने या खेळाचा समारोप सुवर्णपदकाने केला आहे.

बोपण्णाने नुकताच आपला शेवटचा डेव्हिस चषकही खेळला होता आणि तेव्हापासून तो लवकरच निवृत्त होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. बोपण्णा आणि ऋतुजा ही जोडी पहिल्या सेटमध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आणि चायनीज तैपेई जोडीने पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला. मात्र, बोपण्णाने आपल्या अनुभवाचा वापर करत दमरात पुनरागमन केलं. भारतीय जोडीने दुसरा सेट 6-3 असा जिंकला. तिसरा सेटही उत्कृष्ट झाला. यावेळी दोन्ही संघांकडून उत्कृष्ट टेनिस खेळले गेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in