अमन सेहरावतचा सुवर्ण धोबीपछाड; सहा पदके पटकावत कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी, अंतिम पांघलला रौप्यपदक

Asian Games wrestling 2026 : भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर करताना ५७ किलो वजनी गटाचे जेतेपद पटकावले.
अमन सेहरावतचा सुवर्ण धोबीपछाड; सहा पदके पटकावत कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी, अंतिम पांघलला रौप्यपदक
अमन सेहरावतचा सुवर्ण धोबीपछाड; सहा पदके पटकावत कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी, अंतिम पांघलला रौप्यपदक
Published on: 

नागोया : भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर करताना ५७ किलो वजनी गटाचे जेतेपद पटकावले. मात्र, महिलांच्या गटात अंतिम पंघालला जपानच्या मेई मियूओकाविरुद्ध १-९ असा पराभव पत्करावा लागल्याने भारताची दुसरी महिला आशियाई विजेती होण्याची तिची संधी हुकली.

भारताने कुस्तीमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सहा पदके जिंकत स्पर्धेतील आपली मोहीम संपवली. २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये एकही सुवर्णपदक मिळाले नव्हते.

अमनने अंतिम फेरीत उत्तर कोरियाचा विद्यमान विश्वविजेता चोंग सॉन्ग हान याचा १०-७ असा पराभव केला. सुरुवातीला हानच्या बचावात्मक रणनीतीमुळे अमनला अडचणी आल्या. मात्र, प्रतिस्पर्ध्याला 'क्लॉक' वर टाकल्यानंतर मिळालेल्या गुणाचा फायदा घेत अमनने टेकडाउन करत ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आणखी एका डावात त्याने ६-१ अशी आघाडी मिळवली.

उत्तरार्धात हानने सलग तीन गुण मिळवत ७-६ अशी आघाडी घेतली. मात्र, अमनने संयम कायम ठेवत आणखी दोन टेकडाऊन करून १०-७ अशी आघाडी घेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. हानने अमनला मिळालेल्या अंतिम गुणाला आव्हान दिले; मात्र त्याचे अपील फेटाळण्यात आले आणि भारताच्या खात्यात आणखी एक गुण जमा झाला.

अमनने उपांत्य फेरीत ताजिकिस्तानच्या आयाल बेलोल्युब्स्कीचा १४-८ असा पराभव केला होता. त्याआधी त्याने जपानच्या यामातो ओगावावर २०-९ अशी तांत्रिक आघाडी घेत विजय मिळवला होता. त्यानंतर कझाकिस्तानच्या नुरदनात ऐतानोव्हला पराभूत करून त्याने उपांत्य फेरी गाठली.

सागर, मनीषाचे आव्हान संपले

७४ किलो वजनी गटात सागर जगलानने मंगोलियाच्या तुल्गा तुमूर-ओचिरचा ८-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, इराणच्या योनेस इमामीचोगाईविरुद्ध त्याला तांत्रिक आघाडीवर पराभव पत्करावा लागला. महिलांच्या ५७ किलो गटात मनीषा भानवालाचेही पदकाचे स्वप्न संपले. उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेत्या जपानच्या अकारी फुजिनामीने तिचा ३-० असा पराभव केला.

अंतिमचे सुवर्ण हुकले

अंतिम पंघालला मात्र ५३ किलो वजनी गटात जपानच्या २०२४ विश्वविजेत्या मेई मियूओकाविरुद्ध १-९ असा पराभव पत्करावा लागला. मियूओकाने अंतिमला एकही ठोस आक्रमण करण्याची संधी दिली नाही. अंतिमने दुसऱ्या सत्रात उजव्या पायावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मियूओकाने वेगवान प्रतिहल्ला करत चार गुणांची चाल खेळली आणि ५-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ९-१ अशी निर्णायक आघाडी मिळवत तिने सुवर्णपदक निश्चित केले.

दीपक पुनियाचे कांस्य

भारताच्या दीपक पुनियाने ९७ किलो वजनी गटात मंगोलियाच्या गनखुयांग गनबातारचा २-१ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. हांगझोऊमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या दीपकने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जुनपेंग झोऊवर १२-२ अशी तांत्रिक मात केली होती. मात्र, उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या शेरझोद पोयोनोव्हकडून त्याला ८-९ असा पराभव पत्करावा लागला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in