नागोया : आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या नेमबाजी मोहिमेची सुरुवात शानदार झाली. अनुभवी रायफल नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला दोन रौप्यपदके मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
इलावेनिलने प्रथम सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले आणि त्यानंतर वैयक्तिक स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली. मात्र, वैयक्तिक अंतिम फेरीतील तिच्या कामगिरीत निराशेची किनार राहिली. अंतिम फेरीतील बहुतांश वेळ ती सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र अखेरच्या टप्प्यात जपानच्या हिनाता ताइचीने संयमी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
२०२५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इलावेनिलने २५२.४ गुण मिळवले. ती सुवर्णपदक विजेत्या ताइचीपेक्षा केवळ ०.६ गुणांनी मागे राहिली. ताइचीने २५३.० गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम नोंदवला. दक्षिण कोरियाची विद्यमान जागतिक विजेती आणि पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बान ह्यो-जिन हिने २३०.४ गुणांसह कांस्यपदक मिळवले.
अंतिम फेरीत इलावेनिलने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी केली. १७व्या शॉटनंतर ती बान ह्यो-जिनपेक्षा १.४ गुणांनी आघाडीवर होती, तर ताइची तिसऱ्या स्थानावर होती. २१व्या शॉटनंतरही इलावेनिल जपानी नेमबाजापेक्षा ०.२ गुणांनी पुढे होती. मात्र अंतिम टप्प्यात दबाव वाढला आणि गुणांमधील अंतर कमी होत गेले. अखेरच्या दोन शॉट्सपूर्वी इलावेनिल ताइचीपेक्षा ०.३ गुणांनी मागे होती. तिने १०.४ गुणांचा शॉट घेतला, मात्र ताइचीने १०.६ गुण मिळवत आपली आघाडी ०.५ गुणांपर्यंत वाढवली.
अखेरच्या शॉटमध्ये इलावेनिलला सुवर्णपदकासाठी मोठी कामगिरी करण्याची गरज होती. तिने १०.१ गुण मिळवले, परंतु ताइचीने १०.२ गुणांचा शॉट घेत सुवर्णपदक निश्चित केले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
आपली एकाग्रता काहीशी कमी झाल्याचे इलावेनिलने मान्य केले. “मी अव्वल तीनमध्ये असल्याचे कुठेतरी मनात होते. माझ्या प्रक्रियेवर आणि तंत्रावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतानाच माझी एकाग्रता थोडी कमी झाली. अंतिम फेरीतील कामगिरीवर मला आणखी काम करण्याची गरज आहे. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आणि निकालाबद्दल आनंदी आहे,” असे तिने सांगितले.
गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इलावेनिलने २०२५मध्ये शिमकेंट येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
पहिलेच वैयक्तिक आशियाई पदक
इलावेनिलचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिले वैयक्तिक पदक आहे. तिने २०१८च्या जकार्ता आणि २०२२च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता; मात्र त्या दोन्ही स्पर्धांमध्ये तिला पदक मिळवता आले नव्हते.
इलावेनिलचा यशाचा मंत्र : शांत, संयमी आणि समाधानी
नागोया : इलावेनिल वालारिवनच्या चेहऱ्यावरील हास्य तिच्या गळ्यातील पदकाच्या रंगावर कधीच अवलंबून नसते. रविवारी सुवर्णपदकाची संधी हातातून निसटूनही २७ वर्षीय भारतीय एअर रायफल नेमबाज त्याच प्रसन्न हास्यासह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शूटिंग रेंजमधून बाहेर पडली. शांत, संयमी आणि आश्चर्यकारकरित्या समाधानी अशी तिची देहबोली होती.
महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत बराच काळ इलावेनिलचे वर्चस्व राहिले. तिने जवळपास १.५ गुणांची आघाडी घेतली होती आणि स्पर्धेच्या उत्तरार्धातही ती आघाडी कायम होती. मात्र अखेरच्या टप्प्यातील तीन चुकीच्या शॉट्समुळे सामन्याचे चित्रच बदलले आणि हातात असल्यासारखे वाटणारे सुवर्णपदक तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तरीही तिच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती किंवा घडलेली गोष्ट लपवण्याचा प्रयत्नही नव्हता. “मी थोडी रिलॅक्स झाले होते. अंतिम फेरीतील कामगिरीवर मला आणखी काम करण्याची गरज आहे,” असे इलावेनिलने सांगितले.
आणखी एकदा सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याची खंत करण्याऐवजी इलावेनिल आता एका साध्या गोष्टीची वाट पाहत आहे. “आता विश्रांती आणि रिकव्हरी. मला माझ्या बेडची खूप आठवण येत आहे,” असे हसत ती म्हणाली. “मला परत जाऊन माझ्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांसोबत हे यश साजरे करायचे आहे.” यावर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी काही दिवसांसाठी थांबवता येईल, असेही तिने सूचित केले.
महिलांचीही दमदार कामगिरी
वैयक्तिक अंतिम फेरीपूर्वीच इलावेनिलने सोनम उत्तम मस्कर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या विदर्सा विनोद यांच्यासोबत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.
भारतीय त्रिकुटाने पात्रता फेरीत एकूण १८९८.० गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. चीनने पात्रता फेरीतील जागतिक विक्रमही मोडला. यापूर्वीचा १९०२.० गुणांचा विक्रम गेल्या ऑगस्टमध्ये शिमकेंट येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत चीननेच नोंदवला होता. भारत आणि जपानमधील रौप्यपदकाची लढत मात्र अत्यंत चुरशीची झाली. जपानने १८९७.१ गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले. भारतापेक्षा तो केवळ ०.९ गुणांनी मागे राहिला.
संघाच्या पदकाचा निर्णय तिन्ही नेमबाजांच्या पात्रता फेरीतील गुणांवर होत असल्याने प्रत्येक शॉट महत्त्वाचा ठरतो. पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सोनमने ६३४.१ गुण मिळवत भारताचे नेतृत्व केले. इलावेनिलने ६३३.५ गुणांसह सातवे, तर विदर्साने ६३०.४ गुणांसह १२वे स्थान मिळवले. विदर्साला वैयक्तिक अंतिम फेरी गाठता आली नसली तरी सांघिक रौप्यपदकाच्या भारताच्या यशात तिचे योगदान निर्णायक ठरले.
“होय, हे मोठे यश आहे. मला वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही, ही वेगळी बाब आहे; मात्र सांघिक रौप्यपदकामुळे आम्हाला चांगली सुरुवात मिळाली,” असे विदर्साने सांगितले.
केरळच्या २७ वर्षीय विदर्साने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पणातही आत्मविश्वासपूर्ण कामगिरी केली. “मी अजिबात घाबरले नव्हते. माझा आत्मविश्वास कायम होता आणि मी केवळ नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले,” असे तिने सांगितले.
विशेष म्हणजे विदर्साने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी १० मीटर एअर रायफल प्रकार स्वीकारला होता. तिचा मुख्य प्रकार ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन्स हा आहे. मात्र, तिने या नव्या प्रकाराशी वेगाने जुळवून घेत भारताला जपानपेक्षा आघाडीवर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवले.
“५० मीटर थ्री-पोझिशन्स हा माझा मुख्य प्रकार असल्याने त्यात मी निश्चितच आणखी चांगली कामगिरी करेन, असा मला विश्वास आहे,” असे विदर्साने सांगितले.
पात्रता फेरीत चीनची ताकदही दिसून आली. कनिष्ठ जागतिक विजेती वांग झिफेई हिने ६३८.८ गुणांसह अव्वल स्थान मिळवत पात्रता फेरीतील आशियाई विक्रम नोंदवला. तिची सहकारी हान जियानने ६३३.८ गुणांसह पाचवे स्थान मिळवत वैयक्तिक अंतिम फेरी गाठली.
चीनच्या तीन नेमबाजांनी पात्रता फेरीत आघाडीच्या स्थानांमध्ये स्थान मिळवले; मात्र एका देशातील केवळ दोन खेळाडूंनाच वैयक्तिक पदक फेरीत सहभागी होता येत असल्याने चीनची तिसरी नेमबाज अंतिम फेरीपासून वंचित राहिली.
हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि सहा कांस्य अशी विक्रमी २२ पदके जिंकली होती.