

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात भारताच्या ईशा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. पाच शूट-ऑफपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात एका गुणाच्या फरकाने तिचे सुवर्ण पदक हुकले.
जगातील अव्वल क्रमांकाच्या २१ वर्षीय ईशाने तीन शूट-ऑफ जिंकत रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती. यानंतर चीनच्या जिओ जियारुईक्सुआनविरुद्ध सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत दोन्ही खेळाडू नियमावलीनुसार ३८ गुणांवर बरोबरीत होत्या. मात्र, अंतिम शूट-ऑफच्या शेवटच्या शॉटमध्ये ईशाचा नेम चुकला आणि तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सामना संपल्यानंतर ईशाने सांगितले की, “हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठा सामना होता आणि माझ्यावर खूप दबाव होता.” उत्तर कोरियाच्या किम ह्यॉन सुकने ३४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
याआधी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती ठरलेली मनू भाकर या स्पर्धेत ११ व्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही. तिने पात्रता फेरीत ५७९ गुण मिळवले, तर ईशाने ५८० गुण मिळवून आठव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. मनूसाठी ही मोहीम अपयशी ठरली, कारण यापूर्वी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातही तिला पदक मिळवता आले नव्हते.
महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारातही भारताला पदकाची संधी होती, परंतु राही सरनोबतचा महत्त्वाच्या क्षणी शॉट चुकला. चौथ्या मालिकेत राहीने केवळ ३९ गुण मिळवल्याने भारतीय संघ शर्यतीतून बाहेर पडला. २०१८ची सुवर्णपदक विजेती राही ५६८ गुणांसह ३०व्या स्थानावर राहिली. त्यामुळे भारताचे पदक हुकले.
अनुभवी नेमबाज राही सरनोबत हिच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी तिच्या एका शॉटवर गुण न देता तो टार्गेटच्या चौकटीला (फ्रेम) लागल्याचा निवाडा देण्यात आला. यामुळे तिला शून्य गुण मिळाले, ज्याचा मोठा फटका भारताच्या सांघिक पदक जिंकण्याच्या आशांना बसला आहे. राहीच्या हाताला दुखापत झाल्याचेही समजते. या निर्णयामुळे २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती राही सरनोबत अत्यंत निराश झाली. रॅपिड राऊंडच्या पहिल्याच मालिकेत हा वाद उफाळून आला. ज्या मालिकेत तिला १०० पैकी सुमारे ९६ गुणांची अपेक्षा होती, तेथे तिला केवळ ८६ गुणांवर समाधान मानावे लागले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर राहीने तीव्र शंका उपस्थित केली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना राही सरनोबत म्हणाली, “खरे सांगायचे तर नक्की काय झाले हे मला अजूनही समजलेले नाही. सामान्यतः जेव्हा शॉट फ्रेमला लागतो, तेव्हा धातूचा एक वेगळा आवाज येतो. सरावादरम्यान अनेक तरुण खेळाडूंचे शॉट फ्रेमला लागतात, त्यामुळे आम्हाला त्या आवाजाची सवय आहे. परंतु मला असा कोणताही आवाज आला नाही, आणि इतर देशांतील माझ्या काही सहकाऱ्यांनीही काहीही वेगळे ऐकले नसल्याचे सांगितले.”
या घटनेदरम्यान तांत्रिक गोंधळही पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांनी आधी लक्ष्य क्रमांक २१ वर एक अतिरिक्त शॉट नोंदवला गेला असल्याचे सांगितले आणि नंतर राही नेम साधत असलेल्या लक्ष्य क्रमांक २० वर दुसरा अतिरिक्त शॉट दाखवला.