

आशियाई क्रीडा स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतासाठी ‘सोनियाचा दिनु’ ठरला. तिरंदाजीतील पुरुष, महिला आणि मिश्र कंपाऊंड प्रकारात भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण हॅटट्रिक साकारली. महाराष्ट्रातील साहिल जाधव, प्रिथिका प्रदीप यांचा या यशात मोलाचा वाटा होता. त्याशिवाय नेमबाजीतील मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात किनान चेनाईच्या साथीने नीरू धांडाने सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णवेध साधला. भारताने मंगळवारी दिवसभरात ४ सुवर्ण, ३ रौप्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करत पदकतालिकेत १२व्या स्थानावरून आठव्या क्रमांकावर झेप घेतली. भारताच्या खात्यात सध्या १० सुवर्ण, २१ रौप्य, २९ कांस्य अशी ६० पदके जमा आहेत. एकूणच सुवर्ण चौकारासह भारताने सप्टेंबरची सोनेरी सांगता केली.
तिरंदाजीत सोने पे सुहागा, तिहेरी पदकांवर निशाणा
नागोया : भारतीय तिरंदाजांनी बुधवारचा दिवस गाजवला. पुरुष, महिला व मिश्र अशा तिन्ही कंपाऊंड प्रकारात भारताने सलग दुसऱ्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे साहिल जाधव व प्रिथिका प्रदीप यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.
जपान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिवसाच्या सुरुवातीला प्रिथिका प्रदीप, चिकिथा तनिपर्थी, ज्योती वेन्नम या महिलांच्या त्रिकुटाने सांघिक प्रकारात चीनला अंतिम फेरीत २३८-२३४ असे नमवून सुवर्ण काबिज केले. त्यानंतर मिश्र सांघिक प्रकारात साहिल व चिकिथा यांच्या जोडीने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या जोडीवर १५७-१५७ अशा बरोबरीनंतर शूटऑफमध्ये २०-१९ अशी सरशी साधली. मग साहिल, गणेश थिरुमुरू, कुशाल दलाल या पुरुषांच्या त्रिकुटाने सांघिक प्रकारातील अंतिम फेरीत चीनवर २३८-२३७ अशी अवघ्या एका गुणाच्या फरकाने मात करून भारतासाठी तिसरे सुवर्ण जिंकले. मुख्य म्हणजे अंतिम फेरीत चौथ्या सेटपर्यंत भारत १ गुणाने पिछाडीवर होता. मात्र साहिलसह अन्य दोघांनी सातत्याने १० गुणांवर निशाणा साधला, तर चीनकडून तेव्हाच चूक झाली. २०२३च्या आशियाई स्पर्धेतही भारताने तिन्ही विभागांत सुवर्ण यश संपादन केले होते.
महिलांच्या सांघिक प्रकारात ज्योती, चिकिथा आणि प्रिथिका यांनी २०१४ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. मिश्र सांघिक अंतिम फेरीत पदार्पण करणारी चिकिथा आणि साहिल या जोडीने कोरियाच्या जुंग्युन पार्क आणि चोई इ्युन ग्यु यांच्याविरुद्ध १५८-१५७ अशा चुरशीच्या शूट-ऑफमध्ये विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी उपांत्य फेरीत भारतीय जोडीने थायलंडचा १५६-१५५ असा पराभव केला होता.
साहिल-चिकिथा ऑलिम्पिकसाठी पात्र
चिकिथा आणि साहिल या जोडीने सुवर्णपदक पटकावण्यासोबतच आगामी ऑलिम्पिकसाठी भारताचा कोटा देखील निश्चित केला. लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकमध्ये कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश होणार असून, या प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला.
नीरू-किनानची सुवर्ण किमया
नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत भारताच्या नीरू धांडा आणि किनान चेनाई या जोडीने कंपाऊंड ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. नीरूचे हे सलग दुसरे सुवर्ण ठरले. मंगळवारी नीरूने वैयक्तिक प्रकारातही सुवर्ण निशाणा साधला होता.
बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने ३४ गुण मिळवत नवा आशियाई विक्रम रचला आणि देशाच्या नेमबाजी मोहिमेची दमदार सांगता केली. पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी केली. कतारच्या मोहम्मद अल-रुमाइही आणि रे बासिल या जोडीने ३२ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले, तर कतारच्याच नावावर असलेला ३० गुणांचा मागील आशियाई विक्रम या वर्षी जानेवारीमध्ये झाला होता. चीनच्या ची यिंग आणि सन युनोंग यांनी २३ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.
या स्पर्धेत २६ वर्षीय नीरू हिने आदल्या दिवशी आशियाई विक्रम करत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक ट्रॅप पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तसेच, या स्पर्धेतील भारताचे हे पहिले वैयक्तिक नेमबाजी सुवर्णपदक ठरले, यापूर्वी नीरूने महिलांच्या ट्रॅप संघात अशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्यासह रौप्यपदक जिंकले होते.
पात्रता फेरीत किनाने ७३ गुण मिळवले, तर नीरूने ६३ गुण मिळवले होते. सुरुवातीच्या काही अडचणींनंतर कैनान आणि नीरूने अंतिम फेरीत जोरदार पुनरागमन केले. विजय मिळवल्यानंतर किनान म्हणाला की, “आज ज्या गन बॅरलने मी खेळलो, ती माझ्या वडिलांची आहे आणि ती माझ्यासाठी अतिशय लकी ठरली आहे.” दरम्यान, पावसाच्या आणि थंडीच्या वातावरणामुळे शरीरात आलेल्या ताठरतेमुळे पात्रता फेरीत आपली कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, असे नीरूने स्पष्ट केले.
एकूणच नीरूने मिळवलेले दुहेरी सुवर्ण यश नेमबाजासांठी दिलासा देणारे ठरले आहे. यानंतरही अशीच कामगिरी अपेक्षित आहे.
एकूण पदके ६०
भारताने बुधवारी दिवसभरात सात पदकांची कमाई केली. यामध्ये ४ सुवर्ण, ३ कांस्यपदकांचा समावेश होता. सध्या १० सुवर्ण, २१ रौप्य, २९ कांस्य अशा एकूण ६० पदकांसह भारत पदकतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. दोन दिवसांपूर्वी भारत १२व्या स्थानी होता.