

काकामिगहारा : आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या दिलप्रीत सिंगच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी दक्षिण कोरियाचा ८-२ असा दणदणीत पराभव केला.
या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली आहे. अ-गटामध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला असून, भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. यापूर्वी भारताने इंडोनेशियाचा १३-१ आणि श्रीलंकेचा १६-१ असा पराभव केला होता. विद्यमान विजेता भारतीय संघ शनिवारी यजमान जपानविरुद्ध मैदानात उतरेल.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत कोरियावर दबाव निर्माण केला. चौथ्याच मिनिटाला उपकर्णधार हार्दिक सिंगने दिलेल्या पासवर शिलानंद लाक्राने गोल नोंदवून भारताचे खाते उघडले.
१०व्या मिनिटाला मनदीप सिंगच्या पासवर दिलप्रीत सिंगने उत्कृष्ट गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. पुढील मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. पहिल्या १५ मिनिटांच्या शेवटी अभिषेकने शिलानंदच्या पासवर भारताचा चौथा गोल नोंदवला. दुसऱ्या सत्रातही भारताचे वर्चस्व कायम राहिले. २६व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने मनदीपच्या क्रॉसवर गोल करत संघाचा पाचवा गोल झळकावला.
मध्यंतरानंतर ३२व्या मिनिटाला दिलप्रीतने शानदार तोमाहॉक शॉटद्वारे आपली हॅटट्रिक पूर्ण करत भारताला ६-० ने पुढे नेले. यानंतर ३८व्या मिनिटाला सुखजित सिंगच्या प्रयत्नानंतर परतलेल्या चेंडूवर अभिषेकने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून भारताची आघाडी ७-केली. तिसऱ्या सत्राच्या अखेरीस ४२ व्या मिनिटाला कोरियाच्या किम जे हो याने पहिला गोल केला.
शेवटाच्या चौथ्या सत्रात कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. ५२व्या मिनिटाला किम योंग बॉकने तीन भारतीय बचावपटूंना चकवत कोरियासाठी दुसरा गोल केला. भारताचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन अंतिम मिनिटांतील पेनल्टी कॉर्नरच्या कामगिरीवर थोडे नाराज दिसले, कारण भारताने सलग चार पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. मात्र, सामन्यच्या अखेरच्या सेकंदात राजेंद्र सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताच्या ८-२ अशा शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिलांची आज जपानशी गाठ
भारतीय महिला हॉकी संघाची शुक्रवारी चौथ्या साखळी सामन्यात जपानशी गाठ पडणार आहे. भारताने यापूर्वीचे तिन्ही सामने सहज जिंकले आहेत. त्यामुळे सकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या लढतीत विजयी चौकार लगावण्यास महिला संघ उत्सुक असेल.