Asian Games 2026 : सुवर्णपदकांचा षटकार, भारत पाचव्या स्थानी स्वार

आशियाई क्रीडा स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस भारतासाठी जणू सोनियाचा दिनु ठरला. हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने तब्बल ४४ वर्षांनी ऐतिहासिक सुवर्णपदक काबिज केले.
Asian Games 2026 : सुवर्णपदकांचा षटकार, भारत पाचव्या स्थानी स्वार
Asian Games 2026 : सुवर्णपदकांचा षटकार, भारत पाचव्या स्थानी स्वार
Published on: 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस भारतासाठी जणू सोनियाचा दिनु ठरला. हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने तब्बल ४४ वर्षांनी ऐतिहासिक सुवर्णपदक काबिज केले. तसेच २०२८च्या ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहैन, अंकुश पंघाल, परवीन हूडा यांनी गोल्डन पंच लगावला. कुस्तीमध्ये सुजीत कलकलने पिछाडीवरून सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला, तिरंदाजीत महिला संघाने सुवर्ण लक्ष्यभेद केला. एकूणच दिवसभरातील ६ सुवर्णांसह १० पदकांमुळे भारताने पदकतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. आता शनिवारी भारताला हॉकी आणि क्रिकेटमध्ये पुरुष संघांकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. तसेच कुस्तीमध्येही आणखी पदके अपेक्षित आहेत.

काकामिगाहारा : अखेर ४४ वर्षांचा सुवर्ण दुष्काळ शुक्रवारी संपुष्टात आला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीच्या अंतिम फेरीत भारताने गतविजेत्या आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीनचा १-० असा पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले. १९८२नंतर प्रथमच आशियाई सुवर्ण जिंकताना भारताने २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची थेट पात्रता मिळवली. लालरेमसियामीने केलेला एकमेव गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरला. मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने हे यश संपादन केले.

सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महिला संघाने साखळीत पाचही सामने जिंकून अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठली होती. मग दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. चीनने दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला होता. २०२२मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर चीनने त्यावेळीदेखील सुवर्ण जिंकले होते. त्यामुळे भारत त्यांना रोखणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ४४ वर्षांनी भारताने सुवर्ण काबिज करून दाखवले.

अंतिम फेरीत सामन्याच्या १०व्या मिनिटाला साक्षी राणाने सर्कलमध्ये पाठवलेल्या चेंडूवर लालरेम्सियामीने जबरदस्त रिव्हर्स-स्टिक फटका मारत चेंडू थेट गोल जाळ्यात पाठवला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये बाणलेल्या या आघाडीनंतर चायनीज संघाने सामन्यात जोरदार आक्रमण केले. गोलरक्षक बिच्छू देवीने संपूर्ण सामन्यात अभेद्य भिंत उभी करत चीनचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. २४व्या मिनिटाला चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला असताना बदली गोलरक्षक सविता पुनियाने डाव्या बाजूला डाइव्ह मारत शानदार बचाव केला आणि भारताची आघाडी कायम राखली.

दुसऱ्या सत्रात चीनने गोल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आणि अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले. नवननीत कौरने गोललाइनवरून चेंडू बाहेर काढत भारताचे सुवर्णपदक सुरक्षित ठेवले. याआधी भारताने १९८२ मध्ये महिला हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर १९९८ आणि २०१८ मध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानवे लागले होते. यंदा मात्र संपूर्ण संघाने अपवादात्मक जिद्द दाखवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रशिक्षकांचा कानमंत्र

मी मुलींना नेहमी सांगत असतो की, चांगला बचाव, शिस्त आणि सतत धावत राहणे या गोष्टी खेळाच्या दृष्टीने मूलभूत आहेत. पाऊस पडत असो किंवा परिस्थिती प्रतिकूल असो, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही नेहमीच धावू शकता आणि आज आम्ही एक संघ म्हणून तेच करून दाखवले, असे मरिन यांनी सांगितले.

प्रत्येक खेळाडूला ११ लाख

भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला ५.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा हॉकी इंडियाने शुक्रवारी केली. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी सांगितले की, या मोठ्या कामगिरीबद्दल भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला ५.५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

मोदींकडून कौतुक

भारतीय हॉकीसाठी हा अत्यंत खास क्षण आहे. चार दशकांहून अधिक काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणाऱ्या महिला हॉकी संघाच्या यशाचा संपूर्ण भारत आनंद साजरा करत आहे. हे यश त्यांच्या उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरीचे फळ आहे. त्यांची जिद्दही अत्यंत प्रेरणादायी आहे. संघाला त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले.

पुरुषांकडून आज दुहेरी सुवर्ण अपेक्षित

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक कायम राखण्यासह २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठी विश्वविजेता भारतीय संघ शनिवारी मलेशियाविरुद्ध अंतिम फेरीत भिडणार आहे.

भारताने कधीही सलग दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्णपदके जिंकलेली नाहीत, त्यामुळे शनिवारचा हा सामना इतिहासात नवीन अध्याय जोडण्याची सुवर्णसंधी आहे. उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध संघर्ष करावा लागल्यानंतर, आता सलग पाच विजयांसह अपराजित राहिलेल्या मलेशियाविरुद्ध भारताला खेळात सुधारणा करावी लागणार आहे.

मलेशियाने दक्षिण कोरियाविरुद्ध कठीण संघर्ष करत २-१ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितले की, “मलेशियाने स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून, हा एक छान सामना असेल. मलेशिया आणि भारत हे दोन्ही आक्रमक संघ असून त्यांच्याकडे भरपूर वेग, कौशल्य आणि क्षमता आहे.” या विजयासह हरमनप्रीत सिंग सलग दोन आशियाई सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरू शकतो,

वेळ : दुपारी ३.३० वाजता

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in