

नागोया : लक्ष्य सेनने मिळवलेला सनसनाटी विजय आणि त्यानंतर सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, आयुष शेट्टी यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानचा ३-० असा पराभव केला. या विजयासह भारतीय पुरुष संघाने स्पर्धेतील आपले पदक पक्के केले आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघाला जपानकडून १-३ असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या सामन्यात २५ वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीतील सातव्या क्रमांकाच्या आणि दोन वेळच्या जागतिक उपविजेत्या कोडाई नराओकाचा ११-२१, २१-५, २१-१९ असा पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये १४-१९ अशा पिछाडीवर असताना लक्ष्यने सलग सात गुण घेत सामना खिशात घातला. यानंतर पहिल्या दुहेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिराग या जोडीने माजी जागतिक विजेत्या होकी ताकाहाशी आणि कोबायशी युगो यांचा २१-१८, २४-२२ असा पराभव करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली.
तिसऱ्या सामन्यात आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीतील १६ व्या क्रमांकाच्या कोकी वातानाबेचा २१-१०, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव करत भारताच्या विजयावर आणि पदकावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत भारताचा सामना चीन आणि कोरिया यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. जपानविरुद्धचा हा विजय १९८६ च्या सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेतील आठवणींना उजाळा देणारा आहे, असे माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले.
तत्पूर्वी, महिलांच्या विभागात ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने दुहेरीत विजय मिळवला, परंतु एकेरीतील पराभवांमुळे भारताला १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. अनुभवी पी. व्ही. सिंधूला अव्वल खेळाडू यामागुचीकडून कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागला. आता एकेरीत भारतीय महिलांकडून पदकाची अपेक्षा असेल.