Asian Games 2026 : जुगराज, अभिषेक, दिलप्रीतची हॅटट्रिक; भारताकडून श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा

ड्रॅगफ्लिकर जुगराज सिंग, स्ट्रायकर अभिषेक आणि दिलप्रीत सिंग यांनी नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवला.
Asian Games 2026 : जुगराज, अभिषेक, दिलप्रीतची हॅटट्रिक; भारताकडून श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा
Asian Games 2026 : जुगराज, अभिषेक, दिलप्रीतची हॅटट्रिक; भारताकडून श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा X - @TheHockeyIndia
Published on

काकामिगाहारा : ड्रॅगफ्लिकर जुगराज सिंग, स्ट्रायकर अभिषेक आणि दिलप्रीत सिंग यांनी नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवला. अ-गटामधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय नोंदवला. यापूर्वी भारताने इंडोनेशियाचा १३-१ असा पराभव केला होता. भारताचा पुढील सामना गुरुवारी दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.

भारताकडून जुगराज सिंगने १०व्या, २२व्या, ४२व्या आणि ५३व्या मिनिटाला असे एकूण चार गोल झळकावले, तर अभिषेकने ११व्या, १७व्या व ४९व्या मिनिटाला आणि दिलप्रीत सिंगने ३०व्या, ३८व्या व ५५व्या मिनिटाला प्रत्येकी तीन मैदानी गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत सिंगने १६व्या व ४५व्या मिनिटाला दोन गोल केले. मनदीप सिंगने ५व्या, सुखजीत सिंगने २९व्या, मनप्रीत सिंगने ३१व्या आणि विवेक सागर प्रसादने ३६व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाच्या विजयात योगदान दिले. श्रीलंकेकडून ५०व्या मिनिटाला सुरेश रथनायके याने एकमेव गोल केला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेने भारताविरुद्ध केलेला हा पहिलाच गोल ठरला.

सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला मनदीप सिंगने अभिषेकच्या पासवर गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर १०व्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत आघाडी दुप्पट केली. पुढच्याच मिनिटाला अभिषेकने मैदानी गोल केला, तर कर्णधार हरमनप्रीतने १६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल डागला. जुगराजने २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून आणखी एक गोल करत मध्यंतरापूर्वी भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. मध्यंतरापर्यंत भारताने ८-० अशी भक्कम आघाडी घेतली होती.

“मी या निकालाने समाधानी आहे. अंतिम टप्प्यातील आक्रमणाचा चांगला सराव या सामन्यातून झाला. हे सामने आमच्यासाठी सरावाच्या उत्तम संधीसारखे आहेत. कोरिया आणि जपानविरुद्धच्या आगामी कठीण सामन्यांसाठी आम्ही यातून धडे घेतले आहेत,” असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सामन्यानंतर सांगितले. चार गोल करणारा जुगराज सिंग म्हणाला, “संघाने उत्तम कामगिरी केली. प्रशिक्षकांनी दिलेल्या रणनीतीनुसार आम्ही १०० टक्के योगदान दिले. पुढील सामन्यांमध्येही हीच लय कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

महिलांची आज थायलंडशी गाठ

भारतीय महिला हॉकी संघाची बुधवारी तिसऱ्या साखळी सामन्यात थायलंडशी गाठ पडणार आहे. भारताने यापूर्वीचे दोन्ही सामने सहज जिंकले आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या लढतीत हॅटट्रिक साकारण्यासाठी महिला संघ उत्सुक असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in