

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारच्या नवव्या दिवशीदेखील भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र भारताने चंदेरी चौकार लगावला. दिवसभरात भारताने ४ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण आठ पदकांची कमाई केली. यांपैकी ॲथलेटिक्समध्ये भारताने ३ रौप्यपदके पटाकावली.
जपान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी भारतासाठी लांब उडीत मुरली श्रीशंकरने, तर पुरुषांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंहने रौप्यपदक काबिज केले. भालाफेरीत भारताने दुहेरी पदक प्राप्त केले.
नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत संधी लाभलेल्या यशवीर सिंगने रौप्य, तर रोहित यादवने कांस्यपदक जिंकले. एकंदर ॲथलेटिक्समध्ये भारताने दिवसभरात ३ रौप्य व ३ कांस्य अशी सहा पदकांची कमाई केली. नेमबाजीत इशा सिंगने रौप्यपदकावर निशाणा साधला.
आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून २०वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. २०२३च्या आशियाई स्पर्धेत भारताने १०६ पदके जिंकली होती. त्यामुळे यंदा भारतापुढे ही पदकसंख्या ओलांडण्याचे आव्हान आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताची पदकसंख्या तूर्तास ४५ झाली आहे. यामध्ये ४ सुवर्ण, २० रौप्य व २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत १२व्या क्रमांकावर असून चीन १३२ सुवर्णपदकांसह थाटात अग्रस्थानी विराजमान आहे. मुख्य म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी भारताने रौप्यपदकांचा चौकार लगावला, आता सुवर्णपदकाची प्रतीक्षा आहे.