

टोयोटा : आक्रमक आघाडीची खेळाडू दीपिका सेहरावत, ऋतुजा दादासो पिसाळ आणि नवनीत कौर यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इंडोनेशियाचा १७-१ असा धुव्वा उडवला.
गट ‘ब’मधील या सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १९-० असा पराभव करणाऱ्या भारताकडून २२ वर्षीय दीपिकाने ८व्या, २८ व्या आणि ४० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत हॅटट्रिक साधली. ऋतुजाने १५ व्या, २० व्या आणि ३८ व्या मिनिटाला मैदानी गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली, तर नवनीतने ३५ व्या, ५६ व्या आणि ५७ व्या मिनिटाला गोल लगावले. याशिवाय सुनेलिता टोप्पो (११ वे, ३० वे मिनिट), लालरेमसियामी (१२ वे, १६ वे मिनिट) आणि साक्षी राणा (२५ वे, ५७ वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. कर्णधार सलिमा टेटे (३५ वे मिनिट) आणि इशिका चौधरी (३६ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. इंडोनेशियाकडून एकमेव गोल इनेस आदितियाने ३२ व्या मिनिटाला केला.