

काकामिगाहारा : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ड्रॅग-फ्लिकर दीपिका शेरावतच्या एकाच सामन्यातील विक्रमी ९ गोलांच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम ठेवला आहे. बुधवारी झालेल्या ब-गटामधील एकतर्फी सामन्यात भारताने थायलंडचा २०-१ असा दणदणीत पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.
दीपिकाने (दुसऱ्या, ८व्या, ९व्या, २४व्या, ३३व्या, ३६व्या, ३९व्या, ५१व्या आणि ५७व्या मिनिटाला) पेनाल्टी कॉर्नरवर मिळणाऱ्या संधींचे सोने करत आपले नऊही प्रयत्न गोलमध्ये रूपांतरित केले आणि एकाच सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा नवा विक्रम रचला. दीपिका व्यतिरिक्त नवनीत कौरने (चौथ्या, २९व्या, ३५व्या आणि ५१व्या मिनिटाला) ४ गोल करत उत्कृष्ट कामगिरी केली. ऋतुजा पिसाळने (१०व्या, ११व्या आणि ४७व्या मिनिटाला) हॅटट्रिक साजरी केली. याशिवाय नेहा गोयल (१९वे मिनिट), लालरेमसियामी (२६ वे मिनिट), साक्षी राणा (२९वे मिनिट) आणि कर्णधार सलिमा टेटे (४५वे मिनिट) यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवून भारताच्या खात्यात गोलचा डोंगर उभा केला. थायलंडसाठी ५७ व्या मिनिटाला सुपांसा समॅन्सोने पेनाल्टी कॉर्नरच्या व्हेरियशनवर एकमेव सांत्वनपर गोल केला.
या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच भारतीय महिलांनी थायलंडच्या बचावफळीला पुरते उद्ध्वस्त केले. मध्यंतरापर्यंत भारताकडे ११-० अशी मजबूत आघाडी होती. यापूर्वी भारताने उझबेकिस्तानचा १९-० आणि इंडोनेशियाचा १७-१ असा पराभव केला होता. या सामन्यापूर्वी उझबेकिस्तानविरुद्ध ८ आणि इंडोनेशियाविरुद्ध ३ गोल करणाऱ्या दीपिकाने या सामन्यात ८वे आणि तिसरे गोल खाते उघडत आपली एकूण गोलसंख्या आणखी वाढवली. ३ सामन्यांत ३ विजय मिळवून भारतीय संघ 'पूल बी' मध्ये जपानच्या पुढे अव्वल स्थानावर आहे. १२ संघांच्या या स्पर्धेत दोन्ही पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आता शुक्रवारी भारताचा पुढील सामना यजमान जपानशी होणार आहे.
पुरुषांसमोर आज दक्षिण कोरियाचे आव्हान
दोन मोठ्या विजयांसह आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केल्यानंतर, गतविजेत्या भारतासमोर गुरुवारी अ-गटामधील तिसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाचे आव्हान असेल, जी त्यांची पहिली खरी कसोटी ठरेल. इंडोनेशिया आणि श्रीलंका यांच्यावर अनुक्रमे १३-१ आणि १६-१ असे दणदणीत विजय मिळवून भारताने आपल्या विजेतेपद राखण्याच्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली आहे. मात्र, पुढील वाटचाल तितकीशी सोपी नाही. कारण त्यांना जपान आणि बांगलादेशचा सामना करावा लागेल. १२ संघांच्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
दीपिकाचे ३ सामन्यांत तब्बल २० गोल
आशियाई क्रीडा स्पर्धेत एकाच सामन्यात ९ गोल आणि तीन सामन्यांत एकूण २० गोल डागून भारताच्या ऐतिहासिक मोहिमेचा चेहरा बनलेल्या स्टार ड्रॅग-फ्लिकर दीपिका शेरावतने आपल्या या यशाचे श्रेय तीन दिग्गजांना दिले आहे. कुस्तीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाकडून मिळालेले ताकदीचे गुण आणि वर्षांनुवर्षांची मेहनत तसेच तीन दिग्गजांचे मार्गदर्शन यांमुळेच हे यश शक्य झाल्याचे २३ वर्षीय दीपिकाने स्पष्ट केले आहे. जपानमधील काकामिगाहारा येथे थायलंडविरुद्धच्या २०-१ अशा दणदणीत विजयात दीपिकाने विक्रमी ९ गोल नोंदवत उझबेकिस्तानविरुद्धचा स्वतःचाच ८ गोलांचा विक्रम मोडीत काढला. “८ गोल केल्यानंतर मी विक्रम रचला आहे याची मला जाणीवही नव्हती. माझे संपूर्ण लक्ष फक्त पेनाल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यावर होते आणि सहकाऱ्यांनी मला या विक्रमाबद्दल सांगितले. अगदी थायलंडविरुद्धच्या सामन्यातही मी गोलांची संख्या मोजली नव्हती, मात्र मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मारिने यांनी संघ बैठकीत मी माझाच जागतिक विक्रम मोडल्याचे सांगताच मला आनंद झाला.”