भारतीय महिला हॉकी संघाची थाटात अंतिम फेरीत धडक; दक्षिण कोरियावर २-० अशी मात, आता सुवर्णपदकासाठी शुक्रवारी चीनशी गाठ

उत्तम फॉर्मात असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय महिला हॉकी संघाची थाटात अंतिम फेरीत धडक; दक्षिण कोरियावर २-० अशी मात, आता सुवर्णपदकासाठी शुक्रवारी चीनशी गाठ
भारतीय महिला हॉकी संघाची थाटात अंतिम फेरीत धडक; दक्षिण कोरियावर २-० अशी मात, आता सुवर्णपदकासाठी शुक्रवारी चीनशी गाठ(Photo-X)
Published on: 

काकामिगाहारा : उत्तम फॉर्मात असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्यापासून भारत अवघा एक पाऊल दारू आहे. भारताकडून इधिका चौधरीने ४४व्या मिनिटाला आणि कर्णधार सलमा टेटेने ४८व्या मिनिटाला गोल केले. आता शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत भारताची चीनशी गाठ पडेल. चीनने दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानचा शूट-आऊटमध्ये ४-२ असा पराभव केला होता.

पहिल्या दोन सत्रात भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, मात्र कोरियाच्या मजबूत बचावाने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेत कोरियाच्या हाफमध्ये खेळ नियंत्रित केला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला एकापाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु कोरियाच्या गोलरक्षक सेओयेन ली हिने अप्रतिम बचाव करत गोल होऊ दिला नाही.

सामन्याच्या उत्तरार्धातही भारतीय संघाने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. अखेर ४४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरील एका सुंदर मुव्हमेंटवर इधिका चौधरीने अप्रतिम गोल करत भारताचे खाते उघडले. या यशानंतर जोश उंचावलेल्या भारताकडून अवघ्या चार मिनिटांनंतर, म्हणजेच ४८व्या मिनिटाला कर्णधार सलमा टेटेने उजव्या बाजूने धमाकेदार एकल धाव घेत सुरेख मैदानी गोल केला आणि भारताची आघाडी २-० अशी वाढवली. सामन्याच्या शेवटी कोरियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत चार पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु भारतीय बचावपटूंनी भक्कम रेष राखत कोरियाला एकही गोल करू दिला नाही, हे विशेष.

पुरुषांचा आज पाकिस्तानशी उपांत्य सामना

२०२८च्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून गतविजेता भारत गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. या सामन्यात पुरुष आंतरराष्ट्रीय हॉकीमधील सर्वात तीव्र अशी पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दुसरी उपांत्य फेरी मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळली जाईल. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी अ-गटातील पाचही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in