

नागोया : भारताच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने दबावाखाली अभूतपूर्व कामगिरी करत १० वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाचा ५-३ असा सनसनाटी पराभव केला आणि शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. अनुभवी अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि १७ वर्षांच्या कुमकुम मोहोत यांनी वाऱ्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत अचूक निशाणा साधत गतविजेत्या कोरियाला मागे टाकले आणि हा ऐतिहासिक विजय साकारला.
या विजयामुळे भारतीय महिला संघाच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. यापूर्वी मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाच वर्षांची प्रतीक्षा संपवत सुवर्णपदक जिंकले होते, जिथे त्यांनी उपांत्य फेरीत कोरियाचाच पराभव केला होता. शांघायमध्ये विजय मिळवणाऱ्या संघातच हा बदल करण्यात आला असून, निवड चाचणीत अपयशी ठरलेली माजी विश्वविजेती दीपिका कुमारी हिच्या जागी कीर्तीला संघात स्थान देण्यात आले होते.
पहिल्या दोन सेटमध्ये दोन्ही संघांनी ५४ आणि ५६ गुणांची बरोबरी साधल्यामुळे सुरुवातीला कुणालाही आघाडी घेता आली नाही. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कांग चॅययांगसह ओ येजीन आणि ली युनजी यांचा समावेश असलेल्या कोरियन संघाने तिसऱ्या सेटमध्ये खराब कामगिरी केली. त्यांनी सलग तीन ८ गुण नोंदवत केवळ ५२ गुण मिळवले. भारताने या संधीचा पूर्ण फायदा घेत ५५ गुण मिळवले आणि सेट आपल्या नावावर करत ४-२ अशी आघाडी घेतली.
दबावाखाली असलेल्या कोरियाने चौथ्या सेटमध्ये ५४ गुण घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. कीर्तीने ८ गुणांनी सुरुवात केली, परंतु फेरविचारानंतर तो ९ गुणांत रूपांतरित करण्यात आला, ज्यामुळे भारताची एकूण धावसंख्या ५४ झाली.
महिला रिकर्व्ह संघाचे हे यश भारताचे स्पर्धेतील चौथे तिरंदाजी सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी पुरुष कंपाऊंड, महिला कंपाऊंड आणि मिश्र कंपाऊंड संघाने सुवर्णपदके जिंकली होती. २०२३ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक जिंकले होते.