

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाझ धालिवाल या जोडीने गुरुवारी नेमबाजीतील स्कीट मिश्र संघ प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले. आशियाई खेळांच्या इतिहासात स्कीट मिश्र संघ प्रकारात भारताने जिंकलेले हे पहिलेच पदक ठरले आहे.
वादळी वाऱ्यामुळे कठीण झालेल्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली. या पदकासह भारतीय स्कीट नेमबाजांनी अवघ्या दोन दिवसांत तीन पदकांची कमाई करत नवीन इतिहास रचला आहे. दुसरीकडे, पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल संघात एकाही नेमबाजाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही आणि भारताच्या पदरी निराशा पडली.
बुधवारी अनंतजीत सिंग, भवतेग सिंग गिल आणि मेराज अहमद खान यांनी पुरुषांच्या स्कीट संघात कांस्य, तर परिनाझ, रायझा धिल्लों आणि महेश्वरी चौहान यांनी महिला संघात कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर २४ तासांत अनंतजीत आणि परिनाझ यांनी मिश्र संघातही पदक निश्चित केले. पात्रता फेरीत १३८ गुणांसह हे दोघे चौथ्या स्थानावर होते. यामध्ये अनंतजीतने ७५ पैकी ७०, तर परिणाजने ६८ गुण मिळवले होते. पात्रता फेरीत १४५ गुणांसह कतार पहिल्या, १४३ गुणांसह दक्षिण कोरिया दुसऱ्या आणि १४० गुणांसह चीन तिसऱ्या स्थानावर राहिला होता.
अंतिम फेरीत सर्व चार संघांची गुणसंख्या शून्य करून एलिमिनेशन फेरी सुरू झाली. कतारचा संघ सुरुवातीलाच बाहेर पडल्याने भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले. सुरुवातीला भारतीय जोडीने २४ पैकी २१ नेम अचूक साधले. त्यानंतर तीव्र वाऱ्यामुळे आव्हान अधिक कठीण झाले असतानाही भारतीय जोडीने २४ पैकी २३ गुण मिळवून आपली एकूण गुणसंख्या ४४ वर नेली. चीनने ५२ गुणांसह सुवर्ण तर दक्षिण कोरियाने ५१ गुणांसह रौप्यपदक जिंकले. ४४ गुणांसह भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. परिनाझने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार सोडून तिने स्कीटवर लक्ष केंद्रित केले होते.
चौथ्या स्थानापेक्षा कांस्य मोलाचे
जयपूरच्या २८ वर्षीय अनंतजीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये चौथे स्थान मिळवले होते. "ऑलिम्पिकमध्ये चौथे येण्यापेक्षा पोडियमवर उभे राहून पदक जिंकणे अधिक मोलाचे आहे, त्यामुळे या पदकाचे स्थान सर्वोत्तम आहे," असे अनंतजीत म्हणाला. पटियाला येथील २४ वर्षीय परिनाझचे या आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे.