

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ग्रीको-रोमन ९७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या नितेश सिवाचला सुवर्णपदक हुकवावे लागले असले, तरी त्याने भारताला १९६२ नंतरचे पहिले ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून दिले आहे. दुसरीकडे, महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत मानसी अहलावतला पराभवाचा सामना करावा लागला.
नितेश सिवाचला अंतिम सामन्यात जपानच्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युरी नाकाझाटोविरुद्ध ०-४ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात नितेशकडे भारतासाठी ६४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नाकाझाटोने कडेकोट बचाव करत नितेशला कोणतीही आक्रमक संधी दिली नाही. जपानी मल्लाने नितेशला ढकलत पहिली फेरी २-० अशी आपल्या नावावर केली. १९६२च्या स्पर्धेत मालवा सिंग आणि गणपत आंदळकर यांनी सुवर्णपदके, तर उदयचंद, सज्जनसिंग आणि मारुती माने यांनी रौप्यपदके जिंकली होती. त्यामुळे नितेशचे हे यश खास आहे.
दुसऱ्या फेरीतही नाकाझाटोने डाव साधत नितेशला ग्राऊंड पोझिशनमध्ये ढकलले आणि पकड मजबूत करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हरयाणाच्या पाणिपान जिल्ह्यातील जगसी गावच्या दूधवाड्याचा मुलगा असलेल्या नितेशने या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत तुर्कमेनिस्तानच्या अमनबेर्दी अगामम्मेदोवचा ७-१ असा पराभव केला होता, तर उपांत्य फेरीत मंगोलियाच्या गंखुयाग गनबातारवर तांत्रिक सुपीरिऑरिटीच्या जोरावर ९-० अशी दणदणीत मात केली होती.
दरम्यान, महिलांच्या ६२ किलो गटात मानसी अहलावत कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या अल्तजिन तोगतोखकडून २-५ अशी पराभूत झाली. मंगोलियन मल्लाच्या मजबूत बचावामुळे मानसीचे प्रयत्न अपुरे पडले. मानसीने यापूर्वी किरगिझस्तानच्या इरिना कुज्नेत्सोव्हाचा ६-१ ने पराभव केला होता, मात्र उपांत्य फेरीत तिला जपानच्या आशियाई विजेती ओझाकीविरुद्ध ०-६ असा पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताच्या अन्य मल्लांपैकी सुमित (६० किलो) आणि अमन बारोनिया (७७ किलो) आपापले उपांत्यपूर्व सामने हरल्यामुळे आधीच पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.