

नागोया : भारतीय संघात सुरुवातीला स्थान न मिळालेल्या २५ वर्षीय नाओरेम रोशिबिना देवी हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशू खेळात महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. भारतासाठी सलग तीन आशियाई पदक जिंकणारी ती पहिली वुशूपटू ठरली, हे विशेष.
गुरुवारी आयची प्रीफेक्चरल मार्शल आर्ट्स हॉलमध्ये झालेल्या अंतिम लढतीत रोशिबिनाला चीनच्या झांग जिआओयुकडून ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोशिबिनाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे सलग तिसरे पदक असून यापूर्वी तिने २०१८ मध्ये कांस्य आणि २०२३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
अंतिम सामन्यातील दोन्ही फेऱ्यांमध्ये पाचही पंचांनी चिनी खेळाडूच्या बाजूने ५-० असा निर्णय दिला. पहिल्या फेरीत जिआओयुने ६-२, ६-३, ६-२, ६-२, ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही तिने १०-२, ८-३, ७-३, ७-३, ६-१ अशी वर्चस्ववादी कामगिरी नोंदवली. चिनी खेळाडूचे आक्रमक किक्स आणि तांत्रिक श्रेष्ठता यापुढे रोशिबिनाचा बचाव तोकडा पडला.
सामन्यानंतर बोलताना रोशिबिना भावूक झाली. "यापूर्वीही मी रौप्य जिंकले होते आणि यावेळीही मला रौप्यच मिळाले. मी देशवासीयांना सुवर्णपदक देऊ शकले नाही, याची खंत आहे. स्पर्धेसाठी येण्यापूर्वी अनेक अडचणी होत्या आणि सरावाला पुरेसा वेळ मिळाला नाही, तरीही प्रशिक्षक अमित पाल यांच्या पाठिंब्यामुळे येथे पोहोचू शकले," असे ती म्हणाली. आगामी स्पर्धांमध्ये चुका सुधारून पुनरागमन करण्याचा विश्वास रोशिबिनाने व्यक्त केला.
रोशिबिनाने रौप्य कमाई केली असली तरी भारतीय वुशू पथकातील इतर खेळाडूंना अपयश आले. पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात आर्यन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला, तर ५२ किलो वजनी गटात अपर्णा दुसऱ्या फेरीत बाद झाली. पुरुषांच्या ७५ किलो गटात विक्रांत बालियान पहिल्याच फेरीत पराभूत झाला. ताओलू प्रकारात देवी हांजाबमने एकूण १८.८३९ गुणांसह नववे स्थान मिळवले. न्येमान वांगसूने चांगक्वान प्रकारात १५वे स्थान पटकावले, तर सूरज सिंग ११व्या स्थानी राहिला.
वडिलांचा विरोध, तरीही हार मानली नाही
मूळची मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वासीफाई मयाई लेकाई येथील रहिवासी असलेल्या रोशिबिनाचे वडील नाओरेम दामू सिंग हे शेतकरी आहेत. सुरुवातीला वडिलांचा पाठिंबा नव्हता, मात्र नंतर त्यांनी तिची आवड पाहून संमती दिली. तिच्या प्रवासासाठी आणि सरावासाठी वडिलांनी जमिनीचा तुकडाही विकला होता. जूनमध्ये श्रीनगर येथे झालेल्या निवड चाचणीत दिव्यांशी चौधरीकडून पराभूत झाल्याने रोशिबिनाला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, दिव्यांशीला स्नायूंची दुखापत झाल्यामुळे १० सप्टेंबर रोजी रोशिबिनाचा संघात समावेश करण्यात आला आणि ती थेट घरून सरावाशिवाय स्पर्धेसाठी रवाना झाली. महासंघाने दिव्यांशीचा वैद्यकीय अहवाल सादर करत तिच्या जागी रोशिबिनाची निवड योग्य असल्याचे स्पष्ट केले होते. प्रशिक्षक अमित पाल यांनी सांगितले की, "रोशिबिना सुमारे दीड महिना राष्ट्रीय शिबिराबाहेर होती. १० सप्टेंबरला निवड झाल्यानंतर तिला सरावासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. तरीही तिने रौप्यपदक पटकावून दाखवले."
'जे घडते ते चांगल्यासाठीच'
"जपानला येण्यापूर्वी बरीच अशांतता होती आणि सरावाला वेळ मिळाला नाही. जर अधिक वेळ मिळाला असता तर मी आणखी चांगली कामगिरी केली असती. पण प्रशिक्षक अमित पाल यांच्या पाठिंब्यामुळे मी येथे पोहोचू शकले," असे रोशिबिना म्हणाली. आगामी स्पर्धांमध्ये चुका सुधारून पुनरागमन करण्याचा विश्वास तिने व्यक्त केला.
संघातील निवडीवरून झालेल्या वादावर रोशिबिनाने स्पष्ट केले की, "जे काही घडले ते माझ्यामुळे घडले नव्हते. तो वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय होता आणि तो निर्णय योग्यच होता. मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत आहे."
रोशिबिनाचे हे पाचवे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. तिने २०१८च्या ५ आशियाई स्पर्धेत कांस्य, २०२३ मध्ये रौप्य पटकावले होते. तसेच २०१९च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर २०१६च्या कनिष्ठ जागतिक स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले आहे. एकूणच तिचे हे यश वुशू खेळासह युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.