Asian Games 2026 : सतनाम-सलमान जोडीची संस्मरणीय 'कांस्य'क्रांती

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयन (रोइंग) संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली असताना गुरुवारी सतनाम सिंग आणि सलमान खान या जोडीने पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताची प्रतिष्ठा राखली.
Asian Games 2026 : सतनाम-सलमान जोडीची संस्मरणीय 'कांस्य'क्रांती
(Photo-X)
Published on: 

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयन (रोइंग) संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली असताना गुरुवारी सतनाम सिंग आणि सलमान खान या जोडीने पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताची प्रतिष्ठा राखली. स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारात भारताने जिंकलेले हे पहिलेच पदक ठरले आहे.

नगरगावा आंतरराष्ट्रीय रेगाटा कोर्सवर झालेल्या या स्पर्धेत भारतीय जोडीने ६ मिनिटे १३.२५ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे तर स्थान पटकावले. चीनच्या यी झुडी आणि यिदे निए यांनी ६:०९.३७वेळेसह सुवर्ण, उझबेकिस्तानच्या पावेल सोरिन आणि मेखोजबेक ममतकुलोव्ह यांनी ६:१०.४९ वेळेसह रौप्यपदक जिंकले. भारतीय जोडी सुवर्णपदक विजेत्यांपेक्षा ३.८८ सेकंद मागे राहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. "पुरुष दुहेरी स्कल्समध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला कांस्यपदक मिळाले आहे. त्यांचा संयम आणि समन्वय उल्लेखनीय होता. हे यश त्यांना आगामी काळात अधिक उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करेल," असे पंतप्रधानांनी नमूद केले. आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी स्कल्समध्ये भारताला कधीही पदक मिळाले नव्हते आणि या पहिल्या ऐतिहासिक पदकाचा भाग असल्याचा अभिमान असल्याचे सतनामने सांगितले. तसेच केवळ पाच दिवसांपूर्वीच सलमानसोबत जोडी बनवून हे पदक जिंकल्याचे त्याने स्पष्ट केले. यापूर्वी हांगझो आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या चौकटी स्कल्समध्ये सलमानने कांस्य पटकावले होते.

दुसरीकडे, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात मोठा वाद निर्माण झाला होता. संघ व्यवस्थापकांच्या बैठकीनंतर काही खेळाडूंना मूळ प्रकारातून हटवून राखीव खेळाडूंना पहिल्या संघात स्थान देण्यात आल्याचा आरोप खेळाडूंनी केला. यामुळे दुखावलेले काही खेळाडू अन्नाचा त्याग करून क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले. यावर भारतीय नौकानयन महासंघाचे (आरएफआय) अध्यक्ष बालाजी मारादपा यांनी एका माजी प्रशिक्षकावर खेळाडूंना भडकावल्याचा आरोप केला. वादळामुळे स्पर्धेचा कालावधी चार दिवसांवरून दोन दिवसांचा करण्यात आल्याने संघहित लक्षात घेऊनच प्रशिक्षकांनी हे बदल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नौकानयनातील अन्य प्रकारांत भारताला पदकाने हुलकावणी दिली.

हँडबॉलपटू वळला नौकानयनाकडे

कांस्यपदक विजेता २६ वर्षीय सतनाम सिंग पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील हैंडबॉल खेळाडू होता. २०१८च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या स्वर्णसिंग विर्क यांच्याकडून प्रेरणा घेऊन तो नौकानयनाकडे वळला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील सतनामने २०१८च्या युवा ऑलिम्पिकमध्ये आठवे स्थान पटकावले होते, तर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत नौदलाला एकेरी स्कल्सचे विजेतेपद मिळवून दिले होते.

दुसरीकडे २८ वर्षीय सलमान २०१८ मध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये दाखल झाल्यानंतर नौकानयनाकडे वळला. प्रशिक्षक सत्यवान, सतीश सिरात आणि प्रभात मिश्रा यांनी त्याला मार्गदर्शन केले. आर्मी रोईंग नोडमध्ये कुदरत अली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सलमानने २०२२च्या नॅशनल गेम्स आणि राष्ट्रीय इनडोअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in