१९ जानेवारीपासून रंगणार एशियन लिजंड्स लीगचे दुसरे पर्व; IPL मधील इम्पॅक्ट प्लेयर नियमासह दोन नव्या संघांचा यंदा स्पर्धेत समावेश

जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची संधी मिळणार असून एशियन लिजंड्स लीगचा दुसरा हंगाम १९ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १४ दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
१९ जानेवारीपासून रंगणार एशियन लिजंड्स लीगचे दुसरे पर्व; IPL मधील इम्पॅक्ट प्लेयर नियमासह दोन नव्या संघांचा यंदा स्पर्धेत समावेश
एएनआय
Published on

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची संधी मिळणार असून एशियन लिजंड्स लीगचा दुसरा हंगाम १९ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १४ दिवस ही स्पर्धा चालणार आहे.

वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपने (यूएई) मंगळवारी मुंबई येथे अधिकृतपणे एशियन लिजंड्स लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या शुभारंभाची घोषणा केली. यावेळी आयपीएलप्रमाणेच इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्याची घोषणा करण्यात आली. एशियन लिजंड्स लीगचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक संदीप पाटील म्हणाले की, “एशियन लिजंड्स लीग सीझन २ च्या स्पर्धा आणि तारखांची अधिकृत घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. या हंगामात आम्ही ७ उत्कृष्ट संघांचे स्वागत करत असून यात दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश आहे. पहिला संघ आहे गल्फ ग्लेडिएटर्स - यात आखाती देश आणि असोसिएट क्रिकेट राष्ट्रांमधील खेळाडू असतील. तर दुसरा संघ पाकिस्तान पँथर्स आहे.”

लीगच्या तांत्रिक समितीचे संचालक मदन लाल म्हणाले की, “या हंगामामध्ये आम्ही आयपीएलप्रमाणेच 'इम्पॅक्ट प्लेयर' या क्रिकेटचा रोमांच वाढवणाऱ्या नियमाचा समावेश केला आहे. यामुळे स्पर्धेत अधिक प्रभावी रणनीती, लवचिकतेमुळे अधिक मनोरंजन होईल. लीगमध्ये माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे, हा नियम संपूर्ण वेळापत्रकात ऊर्जा, संतुलन आणि गुणवत्ता राखण्यास मदत करेल. एशियन लीजेंड्स लीग ही केवळ स्पर्धा नाही, तर ती निवृत्त दिग्गज खेळाडूंची आशिया चषक स्पर्धाच आहे. ही स्पर्धा मैदानातील जुन्या प्रतिस्पर्धेला पुन्हा जिवंत करेल आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणाऱ्या महान खेळाडूंना एकत्र आणेल.”

एशियन लिजंड्स लीगचे कमिशनर आकाश चोप्रा आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, “एशियन लीजेंड्स लीगशी जोडले जाणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही स्पर्धा आशियाई क्रिकेटचा वारसा, भावना आणि थोरवी साजरी करते. ही लीग केवळ स्पर्धा नसून त्यापेक्षा जास्त आहे - ही एक भावना आहे, दिग्गज खेळाडूंमधील प्रतिस्पर्धेचे पुनरुज्जीवन आहे, महान विजेत्यांचे पुनर्मिलन आहे आणि पिढ्यानपिढ्या खेळाला आकार देणाऱ्या दिग्गजांना मनापासून वाहिलेली आदरांजली आहे.”

प्रत्येक फ्रँचायझी राउंड-रॉबिन फॉरमॅटनुसार ६ साखळी सामने खेळेल. दुसऱ्या हंगामामध्ये एकूण २५ सामने होतील. यात २१ साखळी सामने आणि ४ नॉक आऊट लढतींचा समावेश असेल.

logo
marathi.freepressjournal.in