रिदमचे ऑलिम्पिक तिकीट पक्के, भारताचे विक्रमी १६ नेमबाज पहिल्यांदाच पात्र

भारताच्या खात्यात २३ पदके जमा असून यामध्ये ९ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्यपदकांचा समावेश आहे.
रिदमचे ऑलिम्पिक तिकीट पक्के, भारताचे विक्रमी १६ नेमबाज पहिल्यांदाच पात्र

जकार्ता : भारताची २० वर्षीय रिदम सांगवानने गुरुवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. याबरोबरीच रिदम पॅरिस ऑलिम्पिक २०२४साठी पात्र ठरली आहे. भारताच्या एकंदर १६ नेमबाजांनी आतापर्यंत ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असून ही आजवरची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे १५ नेमबाज पात्र ठरले होते.

जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रिदमने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारातील एकेरी गटाच्या अंतिम फेरीत २८ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. कोरियाची यांग जिन (४१ गुण) व किम येजी (३२) सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार असून आतापर्यंत या पात्रता स्पर्धेतून इशा सिंग, वरुण तोमर व रिदम यांनी ऑलिम्पिकमधील स्थान सुनिश्चित केले आहे. इशा व वरुण यांनी सोमवारी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक काबिज केले होते. रिदमने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

हरयाणाच्या रिदमने या स्पर्धेत आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. सोमवारी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिने कांस्य, तर मंगळवारी अर्जुन चीमाच्या साथीने तिने १० मीटर मिश्र सांघिक प्रकारात रौप्य प्राप्त केले होते. “देशासाठी कांस्यपदक जिंकण्यासह ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने मी आनंदी होती. वैयक्तिक प्रशिक्षक विनीत कुमार यांना या कामगिरीचे श्रेय जाते. माझ्या कारकीर्दीतील हे सर्वाधिक मोलाचे पदक आहे,” असे रिदम म्हणाली.

कनिष्ठ गटात महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताने तिन्ही पदकांवर नाव कोरले. इशा टाकसाळेने २५३.१ गुणांसह सुवर्ण, ख्याती चौधरीने २५१.२ गुणांसह रौप्य, तर अन्वी राठोडने २२७.७ गुणांसह कांस्यपदक पटकावले. चौथ्या दिवशी पटकावलेल्या या चार पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या २३ पर्यंत उंचावली आहे.

भारताच्या खात्यात २३ पदके जमा असून यामध्ये ९ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्यपदकांचा समावेश आहे. चीन १३ पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

हे नेमबाज आतापर्यंत पात्र

रुद्रांक्ष पाटील, भोवनीश मेंदिराता, स्वप्निल कुसळे, अखिल शेरॉन, मेहुली घोष, सिफ्ट कौर सामरा, राजेश्वरी कुमारी, सरबजोत सिंग, अर्जुन बबुता, तिलोत्तमा सेन, मनू भाकर, अनिष भानवाला, श्रियांका सडंगी, वरुण तोमर, इशा सिंग, रिदम सांगवान.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in