भारतीय महिलांचे पदक निश्चित: हाँगकाँगला नमवून उपांत्य फेरीत धडक; पुरुषांचा संघ मात्र पराभूत

भारतीय पुरुषांना जपानकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. किदाम्बी श्रीकांतला निर्णायक गेममध्ये १९-१२ अशी आघाडी असतानाही पराभवाला सामोरे जावे लागले
भारतीय महिलांचे पदक निश्चित: हाँगकाँगला नमवून उपांत्य फेरीत धडक; पुरुषांचा संघ मात्र पराभूत

शाह आलम (मलेशिया) : पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याबरोबरच भारताचे ऐतिहासिक पदक पक्के झाले आहे. मात्र भारतीय पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात हाँगकाँगचा ३-० असा धूळ चारला. सिंधूने यिन हॅपीला २१-७, १६-२१, २१-१२ असे तीन गेममध्ये नमवले. मग दुहेरीच्या लढतीत तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांनी टिंग-लॅम जोडीवर २१-१०, २१-१४ असे वर्चस्व गाजवले. मग अश्मिता छलिहाने एकेरीच्या दुसऱ्या लढतीत सूम यी हिला २१-१२, २१-१३ अशी धूळ चारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता शनिवारी भारताची उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानशी गाठ पडेल.

भारतीय पुरुषांना जपानकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. किदाम्बी श्रीकांतला निर्णायक गेममध्ये १९-१२ अशी आघाडी असतानाही पराभवाला सामोरे जावे लागले व त्यामुळे भारताचेही आव्हान संपुष्टात आले. निशिमोटोने एच. एस. प्रणॉयला २१-१६, २६-२४ असे पराभूत केले. सात्त्विक-चिराग यांनी केन्या व हिरोकी यांना २१-१५, २१-१७ असे नेस्तनाबूत केले. मग लक्ष्य सेनने कोहो वाटांबेवर २१-१९, २२-२० अशी सरशी साधली. मात्र एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला पराभूत झाल्याने सामना निर्णायक लढतीत पोहोचला. तेथे केंटो मोमोटाने श्रीकांतला १७-२१, २१-९, २२-२० असे पिछाडीवरून नमवले. त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in