महिलांची सुवर्णक्रांती!आशियाई सांघिक स्पर्धेत भारताची प्रथमच सुवर्णपदकावर मोहर

महिलांनी मात्र पुरुषांच्या पुढे जात यंदा सुवर्ण काबिज केले. भारतीय महिलांनी या स्पर्धेत साखळी गटात अग्रमानांकित चीनला नमवले.
महिलांची सुवर्णक्रांती!आशियाई सांघिक स्पर्धेत भारताची प्रथमच सुवर्णपदकावर मोहर
Published on

शाह आलम (मलेशिया) : मलेशियात भारताच्या रणरागिणींनी आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. अंतिम फेरीत महिलांनी थायलंडचा ३-२ असा पराभव केला. पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करणाऱ्या संघाने या स्पर्धेत अग्रमानांकित चीन आणि जपान यांसारख्या बलाढ्य संघांना नमवण्याचा पराक्रम केला. भारतीय पुरुषांनी यापूर्वी २०१६ व २०२०मध्ये कांस्यपदक जिंकले होते. मात्र महिला संघाने यावेळी प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला. १७ वर्षीय अनमोल खर्बने दडपणाखाली केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने रविवारी ऐतिहासिक सुवर्णक्रांती घडवली. आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिलांनी थायलंडवर ३-२ अशी मात करून प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरण्याची किमया साधली.

मलेशिया येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केले होते. मग रविवारी पी. व्ही. सिंधू, अनमोल, ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी अफलातून कामगिरीचा नजराणा पेश केला. त्यामुळे भारताने सोनेरी यश संपादन केले. भारतीय पुरुषांनी यापूर्वी २०१६ व २०२०मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. मात्र यावेळी त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. महिलांनी मात्र पुरुषांच्या पुढे जात यंदा सुवर्ण काबिज केले. भारतीय महिलांनी या स्पर्धेत साखळी गटात अग्रमानांकित चीनला नमवले. मग उपांत्यपूर्व लढतीत हाँगकाँगला धूळ चारली. त्यानंतर उपांत्य फेरीत दोन वेळच्या विजेत्या जपानला त्यांनी नेस्तनाबूत केले. या यशामुळे २८ एप्रिल ते ५ मे दरम्यान रंगणाऱ्या थॉमस-उबर चषकासाठी भारतीय महिलांचा आत्मविश्वास उंचावला असेल. तसेच ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली.

रोमहर्षक अंतिम फेरीतील एकेरीच्या पहिल्या सामन्यात दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने सुपानिडा केटचोंगला २१-१२, २१-१२ अशी धूळ चारली. मग ट्रीसा व गायत्री यांनी महिला दुहेरीत किथीराकूल व रविंदा यांच्या जोडीला २१-१६, १८-२१, २१-१६ असे तीन गेममध्ये पराभूत करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अश्मिता छलिहाला एकेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. तसेच श्रुती मिश्रा व प्रिया कोंजेग यांनाही दुहेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने सामना २-२ असा बरोबरीवर आला. निर्णायक पाचव्या लढतीत अनमोलने पोर्नपिचा चोकीवोंगला २१-१४, २१-९ असे नामोहरम करून भारताचा ऐतिहासिक विजय पक्का केला.

“निर्णायक लढतीत भारतासाठी उत्तम कामगिरी करू शकल्याचे समाधान आहे. माझ्या कारकीर्दीतील हा मौल्यवान क्षण आहे. यापुढे मी आणखी मेहनत करेन. भारताने प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने आम्ही सगळेच आनंदी आहोत व या विजयाचा आनंद दणक्यात साजरा करू,” असे अनमोल विजयानंतर म्हणाली.

भारतीय महिला संघाचे ऐतिहासिक कामगिरीसाठी अभिनंदन. आशियाई सांघिक स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकणे फारच अभिमानास्पद बाब आहे. यामुळे असंख्य उदयोन्मुख क्रीडापटूंना प्रेरणा मिळेल.

- नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

भारताच्या नारीशक्तीने केलेल्या ऐतिहासिक पराक्रमामुळे आजचा दिवस संस्मरणीय ठरला. आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय महिलांचे हार्दिक अभिनंदन. भविष्यातील यशासाठी तुम्हाला शुभेच्छा.

- अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री

भारतीय महिलांनी बॅडमिंटनमध्ये प्रथमच एखादी सांघिक स्पर्धा जिंकली. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई अथवा उबर चषक यांसारख्या स्पर्धांमध्ये त्यांना एकदाही सांघिक पदक जिंकता आलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in