आकांक्षापुढती गगन ठेंगणे

महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील खेळ हे आंतरराष्ट्रीय पातळीकडे वाटचाल करण्याच्या पहिल्या पायरीसारखेच असतात
आकांक्षापुढती गगन ठेंगणे

अनेक उदयोन्मुख खेळाडूंचे कौशल्य त्यांना गॉडफादर मिळू न शकल्याने त्यांच्या वैयक्तिक विश्वापुरतेच मर्यादित राहते; तर काहींचे प्रस्थापितांकडून खच्चीकरण झाल्याने कोमेजून जाते. ‘दुःख से झुकना ना मित्र, के इक पल रुकना ना मित्र...’ असा दृष्टिकोन ठेवणाऱ्या तरूण पिढीच्या ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ अशा स्वरूपाच्या महत्वाकांक्षेलाच मग तडे जातात. पण ‘हिरा तलाशनेवाला अच्छा जोहरी’ मिळाला की महत्वाकांक्षी खेळाडूंची कारकीर्दच पार बदलून जाते. असे खेळाडू मग स्वतःचेच नव्हे तर देशाचे नाव आसमंतात उंचावतात. ‘के शीश झुकाता चल मित्र, के जग पर छाता जा मित्र...’ अशाच शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर चाहत्यांकडून होऊ लागतो, खरोखरच.

वास्तविक, शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील खेळ हे आंतरराष्ट्रीय पातळीकडे वाटचाल करण्याच्या पहिल्या पायरीसारखेच असतात. आता तर ‘खेलो इंडिया’ही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मार्ग आधी रणजी करंडक क्रिकेटमधून जात असे. आता तर तो आयपीएलमधून जाऊ लागला आहे, असे म्हटले तरी ते अप्रस्तुत ठरू नये. याला ‘शॉर्ट कट’ समजा, हवे तर! मात्र तंत्रशुद्ध, कौशल्यपूर्ण खेळाडू कोणत्याही ठिकाणी असू शकतात, हे वास्तव नाकारून चालणार नाही. असे खेळाडू पायरीपायरीने यशाचे शिखर पादाक्रांत करण्यास सक्षम ठरू शकतात, हमखास. फक्त असे खेळाडू कुठे आढळले तर त्यांच्या अंगभूत कलागुणांना दिलदारपणा दाखवत निःपक्षपातीपणे उत्तेजन दिले पाहिजे.

समुद्रात मासे पकडण्याचे जाळे बांधून वेगवान गोलंदाजीचा सराव करणाऱ्या एका महत्वाकांक्षी युवकाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच दखल घेतली, ही बाब या साऱ्या अनुषंगाने महत्त्वाची अशीच आहे. राजस्थानच्या एका १६ वर्षीय युवकाचा गोलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. राहुल गांधींनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. राहुल गांधी यांनी लिहिले की, आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विलक्षण प्रतिभा आहे आणि अशी प्रतिभा दुर्लक्षित राहता कामा नये. प्रतिभावंतांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे.

राहुल गांधी केवळ एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या युवकाला त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. राहुल गांधींच्या या ट्विटला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विटवरूनच सकारात्मक उत्तर देत सर्वतोपरी बांधिलकीची तयारी दर्शविली. राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदना यांनी ट्विट करून या युवकाला जयपूरच्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश देण्याची तयारी दर्शविली. या साऱ्याच नेत्यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत.

व्हिडिओमध्ये गोलंदाजी करताना दिसणारा युवक भरत सिंग हा राजसमंदच्या मोजावंतो येथील गुडा गावचा रहिवासी आहे. भारतासाठी क्रिकेट खेळण्याची त्याची मनीषा आहे. जलदगतीने मारा करणाऱ्या प्रतिभावान गोलंदाजांची उणीव भारताला सातत्याने जाणवत आहे. त्यामुळेच वेगवान गोलंदाज होण्याच्या भरतच्या प्रयत्नांना चालना देण्याची आवश्यकता आहे. केवळ पायाभूत +सोयीसुविधांअभावी त्याची जिद्द विरून जाता कामा नये. मोकळ्या जागेत मासे पकडण्याचे जाळे बांधून भरत केवळ एकाच स्टंपवर चेंडू फेकून सराव करतो. त्याच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पाही अचूक असल्याचे जाणवते. म्हणूनच हे कौशल्य उफाळून बाहेर आले पाहिजे. भरतची सर्वतोपरी तयारी करवून घेतली पाहिजे.

मियारी (राजसमंद) गावाशेजारच्या देवपुरा येथील सरकारी शाळेत बारावीला असलेल्या भरतला अकरावीत ७१ टक्के गुण मिळाले आहेत. यावरून गोलंदाजीचा सराव त्याच्या अभ्यासात अडसर ठरतो, असेही दिसून येत नाही. ही बाब खेळाडू आणि त्यांचे पालक यांनी आत्मपरीक्षण करण्यासारखी आहे. भरत आधी टेनिस बॉलने सराव करायचा. गेल्या एक वर्षापासून भरत लेदर बॉलने सराव करीत आहे. कुटुंबात चार भावंडे असूनही तो एकटाच सराव करतो हे विशेष. तो एकटाच सराव करत असल्याने चेडू आणायला धावावे लागू नये म्हणून तो चक्क मासे पकडण्याचे जाळे बांधून ‘नेट’मध्ये सराव केल्याच्या थाटात आपली ईर्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असतो. ‘जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह ओ शाम...’ अशा आविर्भावातच त्याचा सराव सुरू असतो, जणू. माळरानावरील खडबडीत जागा साफ करून ५० मीटरमध्ये त्याने खेळपट्टी तयार केली आहे. तो त्याच्या आजीकडे गेला तरी सराव टाळत नाही. आता बोला!

भरतने स्वतः गोलंदाजीचा व्हिडिओ तयार केला, हेही खासच. व्हिडिओ पाहून तो कुठे चुकतेय, याची चाचपणी करतो आणि पुढील सरावाच्या वेळी सुधारणा करतो. व्हिडिओ बनवण्यासाठी तो मोबाईल दगडावर ठेवून गोलंदाजी करतो. भरतच्या या चिकाटीची सरकार-दरबारी घेण्यात आलेली दखल म्हणूनच महत्वपूर्ण ठरते. एका होतकरू खेळाडूच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा दीपस्तंभ ठरते.

भरतचे वडील कालू सिंग खरवड हे शेतकरी असून आई गृहिणी आहे. भरत हा सर्वात मोठा आहे. त्याला जमना कुमारी, सुकुना कुमारी या दोन बहिणी आणि धाकटा भाऊ विराम सिंग अशी भावंडे आहेत. त्यामुळे भरतच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असणार, हे स्पष्टच आहे. ‘के रास्ता कट जाएगा मित्र, के बादल छंट जाए मित्र...’ असे समजूनच भरतचे वडील आशावादी वाटचाल करीत असणार. पैशांच्या कमतरतेमुळे भरत क्रिकेट अकादमीत सहभागी होऊ शकला नाही; पण ‘जो जीवन से हार मानता, उसकी हो गयी छुट्टी...’ याच भावनेतून गेली दोन वर्षे त्याने सराव काही थांबविलेला नसावा, असे दिसते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मामाकडेही जाता आले नाही. आता सरकारचा वरदहस्त मिळाला आहेच; तर भरतला योग्य प्रशिक्षण मिळून तो देशासाठी दर्जेदार गोलंदाज व्हावा म्हणून ‘के रात बिखर जायेगी मित्र, के बात निखर जायेगी मित्र...’ अशीच हार्दिक सदिच्छा.

भरत गोलंदाजीत निष्णात झाला, तरी पुढील वाटचालीतही त्याच्यावर अन्याय होता कामा नये, याची खबरदारी संबंधितांनी घेणे जरुरीचे आहे. बऱ्याचदा प्रस्थापितांकडून गॉडफादर नसलेल्यांवर, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांवर अन्याय होत असल्याची उदाहरणे पाहायला मिळत असतात. त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहिले जाते. सर्वोच्च दर्जाची प्रतिभा असूनही त्यांना कमी लेखले जाते. त्यांच्या उणिवा काढून त्यांना नाहक लक्ष केले जाते आणि त्यांच्या जागी वशिल्यांच्या तट्टूंची वर्णी लावली जाते. त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्नही होत असतो. प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हे घडत असते. निदान सद‌्गृृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये तरी असे होता कामा नये. तंत्र-कौशल्य यांचा आदर राखलाच गेला पाहिजे, खचितच. असे झाले तरच ‘हिम्मत अपना दीन धर्म है, हिम्मत है ईमान...’ असा स्वत:ला दिलासा देत ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ वाटणारे अनेक खेळाडू निर्माण होऊ शकतील, निश्चितच.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in