रोहितच्या विनंतीमुळे त्यावेळी प्रशिक्षकपद पुन्हा स्वीकारले! द्रविड यांनी निरोपाच्या भाषणात दिला आठवणींना उजाळा

रोहित शर्माच्या विनंतीमुळे मी पुन्हा प्रशिक्षकपद स्वीकारले, अशी कबुली भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली. तसेच निरोपाच्या भाषणात त्यांनी विराट कोहलीलासुद्धा खास संदेश दिला.
रोहितच्या विनंतीमुळे त्यावेळी प्रशिक्षकपद पुन्हा स्वीकारले! द्रविड यांनी निरोपाच्या भाषणात दिला आठवणींना उजाळा
@jeet_2109/ X

ब्रिजटाऊन (बार्बाडोस) : २०२३मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर मी पूर्णपणे हताश झालो होतो. त्यावेळी मी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासही उत्सुक नव्हतो. मात्र रोहित शर्माच्या विनंतीमुळे मी पुन्हा प्रशिक्षकपद स्वीकारले, अशी कबुली भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली. तसेच निरोपाच्या भाषणात त्यांनी विराट कोहलीलासुद्धा खास संदेश दिला.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात केली. १७ वर्षांनी प्रथमच भारताने ही स्पर्धा जिंकली, तर २०१३ नंतर त्यांचे हे पहिलेच आयसीसी जेतेपद ठरले. भारताने या स्पर्धेत अखेरपर्यंत अपराजित राहून जगज्जेतेपद काबिज केले. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची ही अखेरची स्पर्धा होती. २०२१पासून भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या द्रविड यांना थाटात निरोप देण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. त्यामुळे द्रविड यांनीही ड्रेसिंग रूममध्ये निरोपाच्या भाषणात सर्व खेळाडूंचे विशेष आभार मानले.

“२०२३चा एकदिवसीय विश्वचषक फारच संस्मरणीय होता. मात्र अंतिम फेरीतील पराभव तितकाच जिव्हारी लागणारा ठरला. या पराभवामुळे तुम्हा सर्वांसह मीसुद्धा निराश झालो होतो. त्यावेळी पुन्हा प्रशिक्षकपद स्वीकारायचे नाही, हे मी मनाशी पक्के केले होते. मात्र नोव्हेंबरमध्ये रोहितने माझ्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. त्याने मला टी-२० विश्वचषकापर्यंत थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी पुन्हा प्रशिक्षकपद स्वीकारले,” असे ५१ वर्षीय द्रविड म्हणाले.

“मला या संघातील प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. तुम्ही संपूर्ण स्पर्धेदरम्यान विविध टप्प्यांवर योगदान दिले. माझ्या प्रशिक्षण कारकीर्दीचा असाप्रकारे शेवट केल्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो,” असेही द्रविड यांनी नमूद केले. त्याशिवाय द्रविडने बीसीसीआयचे पदाधिकारी व प्रशिक्षण फळीतील अन्य सर्वांचेही आर्वजून आभार मानले.

आता लाल चेंडूचे जगज्जेतेपद शिल्लक!

प्रशिक्षक द्रविड यांनी विराटला टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच विराटने कारकीर्दीत एकदिवसीय, टी-२० व चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीनही आयसीसी स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मात्र लाल चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी द्रविड यांनी विराटला खास संदेश दिला. “तू कारकीर्दीत सर्व पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धा जिंकला आहेस, आता फक्त लाल चेंडूची जिंकणे बाकी आहे. त्यासाठी शुभेच्छा,” असे द्रविड म्हणाले.

भारतीय संघ आज दिल्लीला रवाना

बार्बाडोसमध्ये आलेल्या ‘बीरल’ वादळामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहा व भारतातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी बार्बाडोसमध्येच अडकून होते. मात्र आता हे वादळ शमले असून परिस्थिती ही हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे बार्बाडोस विमानतळ लवकरच खुले करण्यात येणार आहे, असे तेथील पंतप्रधान मिया मोटली यांनी सांगितले. भारतीय संघासाठी विशेष विमानसेवा (चार्टर्ड फ्लाइट) पुरवण्यात येणार असून बुधवारी ते नवी दिल्लीत दाखल होतील, असे समजते. भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते आपापल्या घरी परततील.

logo
marathi.freepressjournal.in