वयाच्या ४३ व्या वर्षी बोपण्णा क्रमवारीत अग्रस्थानी; एब्डनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक

बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे बोपण्णाचा अव्वल क्रमांक पक्का झाला आहे, तर एब्डनसुद्धा दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
वयाच्या ४३ व्या वर्षी बोपण्णा क्रमवारीत अग्रस्थानी; एब्डनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक

मेलबर्न : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. वयाच्या ४३व्या वर्षी त्याने जागतिक टेनिस क्रमवारीत तब्बल अग्रस्थानी झेप घेण्याचा पराक्रम केला. टेनिस इतिहासात प्रथमच इतक्या वयाचा खेळाडू क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान झाला आहे. बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे बोपण्णाचा अव्वल क्रमांक पक्का झाला आहे, तर एब्डनसुद्धा दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत बोपण्णा व एब्डन यांच्या दुसऱ्या मानांकित जोडीने मॅक्सिमो गोन्सालेझ आणि आंद्रे मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या सहाव्या मानांकित जोडीवर ६-४, ७-६ (७-५) अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. त्यांन १ तास, ४६ मिनिटांत सामना जिंकला. गुरुवारी उपांत्य फेरीत बोपण्णा-एब्डनची झँग झिझेन आणि थॉमस मॅच या बिगरमानांकित जोडीशी गाठ पडेल. एब्डन हा ३६ वर्षांचा आहे.

यापूर्वी बोपण्णाने तिसऱ्या स्थानापर्यंत क्रमवारीत मजल मारली होती. मात्र यंदा त्याने उपांत्यपूर्व फेरी जिंकून अग्रस्थान सुनिश्चित केले. इव्हान दोडिग आणि ऑस्टिन क्रॅजिक या क्रोएशियाच्या अग्रमानांकित जोडीचा यावेळी दुसऱ्याच फेरीत पराभूत झाल्याने बोपण्णाने क्रमवारीत आगेकूच केली. यापूर्वी अमेरिकेचा राजीव राम हा वयाच्या ३८व्या वर्षी क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला होता. ऑक्टोबर २०२२मध्ये त्याने अशी कामगिरी केलेली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा बोपण्णा हा दुहेरीतील चौथा भारतीय टेनिसपटू ठरला. यापूर्वी लिएंडर पेस, महेश भूपती व सानिया मिर्झा यांनी हा पराक्रम केला होता.

अल्कराझला पराभवाचा धक्का

जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने स्पेनच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा धक्का दिला. झ्वेरेव्हने ही लढत ६-१, ६-३, ६-७ (२-७), ६-४ अशी चार सेटमध्ये जिंकली. आता त्याची शुक्रवारी रशियाच्या तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवशी गाठ पडेल. मेदवेदेवने हुबर्ट हुर्काझवर ७-६ (७-४), २-६, ६-३, ५-७, ६-४ अशी पाच सेटमध्ये सरशी साधली. महिलांमध्ये क्विनवेन झेंग आणि डायना यास्त्रीस्काने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in