

मुंबई : जून आणि जुलै महिन्यात क्रीडाप्रेमींना अनुक्रमे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची मेजवानी मिळाली. आता ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस क्रीडाविश्व शांत असले तरी लवकरच चाहत्यांसाठी पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धांची मेजवानी सुरू राहील.
ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात पार पडले. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा विश्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले. भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके पटकावली.
आता १५ ऑगस्टपासून एकीकडे भारत-श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. त्याचवेळी १४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पुरुष आणि महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येईल. बेल्जियम व नेदरलँड्स संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित करणार आहे.
भारतात नवी दिल्ली येथे १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत जागतिक बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन या खेळाडूंकडे लक्ष असेल. त्याशिवाय २१ ऑगस्ट रोजी लुसान येथील डायमंड लीगचा टप्पा रंगेल. यामध्ये भालाफेकीत भारताचा तारांकित भालफेकपटू नीरज चोप्रा खेळताना दिसेल. त्याशिवाय ३१ ऑगस्टपासून प्रतिष्ठेची यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होईल. नौकानयन व फॉर्म्युला-१च्या देखील आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑगस्टमध्ये होतील.
यानंतर सप्टेंबरमध्ये जपान येथे आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडू लय मिळवण्यास आतुर असतील. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही थरार कायम असणार आहे.
महिलांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ ३० ऑगस्टपासून आशिया चषक टी-२० स्पर्धा खेळणार आहे. थायलंडविरुद्धच्या लढतीने भारतीय संघ आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्याशिवाय सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान लढतदेखील होईल. याव्यतिरिक्त, डिसेंबरमध्ये भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आता ३ टी-२० सामन्यांची वाढ करण्यात आली आहे. ९ ते १२ डिसेंबर या काळात एकमेव कसोटी, त्यानंतर १६ ते २२ डिसेंबर या काळात ३ एकदिवसीय व २६ ते ३० डिसेंबर या काळात ३ टी-२० लढती खेळवल्या जातील.