

सिडनी : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ५ गडी राखून पराभूत केले. याबरोबरच त्यांनी ॲशेस मालिकेवर ४-१ असे यश संपादन केले. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचा हा कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला.
सिडनी येथे झालेल्या या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव गुरुवारी अखेरच्या दिवशी ३४२ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य उभे ठाकले. जेकब बेथलने कारकीर्दीतील पहिले दीड शतक साकारताना १५४ धावा केल्या. मिचेल स्टार्कने त्याचा अडसर दूर केला.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ ऑस्ट्रेलियादेखील अडणीत होती. जेक वेदराल्ड (३४), ट्रेव्हिस हेड (२९), स्मिथ (१२), मार्नस लबूशेन (३७), ख्वाजा (६) हे अकेरपर्यंत टिकू शकले नाहीत. मात्र कॅरी (नाबाद १६) व कॅमेरून ग्रीन (नाबाद २२) यांनी सहाव्या विकेटसाठी उपयुक्त ४० धावांची भर घातली व कांगारूंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात १६३ धावांची खेळी साकारणारा हेड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर पाच सामन्यांत तब्बल ३१ बळी मिळवण्यासह फलंदाजीतही १५६ धावांचे योगदान दिल्यामुळे स्टार्कला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दरम्यान, १८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिले तीन सामने जिंकून आघाडी घेतली. चौथ्या कसोटीत इंग्लंडने बाजी मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने पाचवी कसोटी जिंकून वर्चस्व कायम राखले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ३८४
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५६७
इंग्लंड (दुसरा डाव) : ८८.२ षटकांत सर्व बाद ३४२ (जेकब बेथल १५४, हॅरी ब्रूक ४२; मिचेल स्टार्क ३/७२)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३१.२ षटकांत ५ बाद १६१ (मार्नस लबूशेन ३७, कॅमेरून ग्रीन नाबाद २२; जोश टंग ३/४२)
सामनावीर : ट्रेव्हिस हेड
मालिकावीर : मिचेल स्टार्क