'लायन'कडून किवी फलंदाजांची शिकार; ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; मालिकेत १-० अशी आघाडी

अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने (६५ धावांत ६ बळी) दुसऱ्या डावात पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या फलंदाजांची शिकार केली.
'लायन'कडून किवी फलंदाजांची शिकार; ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; मालिकेत १-० अशी आघाडी

वेलिंग्टन : अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने (६५ धावांत ६ बळी) दुसऱ्या डावात पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या फलंदाजांची शिकार केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांना तब्बल १७२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह कांगारूंनी दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

वेलिंग्टन येथे झालेल्या या कसोटीत ३६९ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच ६४.४ षटकांत १९६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सलग १२व्यांदा ट्रान्स-टास्मन करंडक आपल्याकडे राखला. कांगारूंच्या संघाने दुसरा सामना गमावला, तरी मालिका बरोबरीत सुटेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा केल्यावर न्यूझीलंडचा संघ १७९ धावांत गारद झाला. मग २०४ धावांच्या आघाडीवर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १६४ धावा करून न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३६९ धावांचे लक्ष्य ठेवले.

शनिवारच्या ३ बाद १११ धावांवरून पुढे खेळताना लायनच्या फिरकीपुढे किवी संघाने शरणागती पत्करली. रचिन रवींद्रने ५९ धावांची एकाकी झुंज दिली. लायनने रवींद्रसह केन विल्यम्सन (९), टॉम लॅथम (८), टॉम ब्लंडेल (०), ग्लेन फिलिप्स (१) असे महत्त्वाचे बळी मिळवले. लायनने पहिल्या डावात ४, तर दुसऱ्या डावात ६ असे एकूण १० गडी बाद केले. मात्र पहिल्या डावात दीडशतक साकारण्यासह गोलंदाजीतही एक बळी मिळवणारा कॅमेरून ग्रीन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांतील दुसरी कसोटी ८ मार्चपासून ख्राईस्टचर्च येथे सुरू होईल.

-तब्बल ९ देशांमध्ये कसोटीच्या एका डावात ५ बळी पटकावणारा लायन हा विश्वातील तिसरा गोलंदाज ठरला. लायनने श्रीलंका, न्यूझीलंड, भारत, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश या देशांत अशी कामगिरी केली आहे. याबाबतीत त्याने मुरलीधरन आणि शेन वॉर्नची बरोबरी साधली.

-गेल्या १३ वर्षांत फक्त दुसऱ्यांदाच न्यूझीलंडला मायदेशातील कसोटीच्या दोन्ही डावांत २००चा आकडाही गाठता आला नाही. यापूर्वी २०१२मध्ये हॅमिल्टनला आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा संघ १८५ व १६८ धावांत गारद झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in