अफगाणिस्तानने इतिहास रचला; उपांत्य फेरीत धडक, चुरशीच्या लढतीत बांगलादेशला लोळवले, ऑस्ट्रेलियालाही वर्ल्डकप बाहेर

T20 World Cup 2024 : चुरशीच्या लढतीत बांगलादेशला नमवल्यानंतर आणि इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडू, सहकाऱ्यांसह मैदानातील प्रेक्षकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.
अफगाणिस्तानने इतिहास रचला; उपांत्य फेरीत धडक, चुरशीच्या लढतीत बांगलादेशला लोळवले,  ऑस्ट्रेलियालाही वर्ल्डकप बाहेर
सौ. सोशल मीडिया

किंग्जटाऊन : टी-२० विश्वचषकात सुपर-८ फेरीच्या अखेरच्या लढतीत अफगाणिस्तानने बांगलादेशला ८ धावांनी लोळवत थाटात टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या लढतीत बांगलादेशला नमवल्यानंतर आणि इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडू, सहकाऱ्यांसह मैदानातील प्रेक्षकांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या आणि बांगलादेशसोबत कांगारूंचाही प्रवास सुपर-८ मध्येच संपला.

पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशला ११४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण १७.५ षटकांत अवघ्या १०५ धावांतच बांगलादेशचा अख्खा संघ गारद झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजांनी वेसण घातले. त्यामुळे २० षटकांत अफगाणिस्तानला ५ गडी गमावून अवघ्या ११५ धावाच बनवता आल्या. १२० चेंडूंमध्ये ११६ धावांचे आव्हान बांगलादेशचा संघ सहज पार पाडेल असे वाटत असताना अफगाणिस्तानच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना मोठे फटके खेळूच दिले नाहीत. ठराविक अंतराने गडी बाद केल्यामुळे अखेरीस ८ गडी गमावल्यामुळे बांगलादेशला १० चेंडूंत १० धावा अशी स्थिती झाली होती. अखेरच्या क्षणी दुसऱ्यांदा आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसाठीचे लक्ष्य बदलून 114 धावांचे झाले. बांगलादेशकडून लिटन दास एकटाच खिंड लढवत होता. पण त्याची खेळी व्यर्थ गेली. कारण अठराव्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर १० धावांची गरज असताना लिटन दास एक धाव घेऊन दुसऱ्या बाजूला गेला. त्यानंतर नवीन उल हकने शानदार गोलंदाजी करीत तास्किन अहमद आणि मुस्तफिझूर रहमान या दोघांनाही लागोपाठच्या चेंडूवर टिपले आणि मैदानात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. सामना संपल्यानंतर, आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, अशी बोलकी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने दिली.

अफगाणिस्तानच्या विजयात नविन उल हक आणि राशिद खान यांनी मोलाची भूमिका बजावली आणि प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडले. राशिदने फलंदाजी करताना १० चेंडूंत १९ धावा करताना मोक्याच्या क्षणी मारलेले तीन षटकारही अफगाणिस्तानच्या विजयात निर्णायक ठरले. अफगाणिस्तानसाठी रहमनुल्ला गुरबाझने सर्वाधिक ४३ धावा (५५ चेंडू) केल्या. तर, बांगलादेशसाठी लिटन दासने ४९ चेंडूत ५४ धावांची नाबाद खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. आता २७ जून रोजी उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी तर अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेसोबत सामना असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in