ऑस्ट्रेलियाकडे आघाडी: हरमनप्रीत कौरचे दोन बळी; भारत-ऑस्ट्रेलिया महिला कसोटी

ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज एलिस पेरी आणि ताहिला मॅकग्रा यांची जोडी जमली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भर घेतली

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या ‘गोल्डन आर्म’मुळे शेवटच्या क्षणी दोन विकेट्स मिळवत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताला जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे पाहुण्यांनी तिसऱ्या दिवसअखेर ४६ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद २३३ धावा केल्या आहेत. 

ताहिला मॅकग्रा आणि अलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाची जोडी मैदानावर चांगलीच जमली असताना, भारताने आपल्या भात्यातील सर्व शस्त्रे पारखून पाहिली. पण भारताला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर तिसऱ्या सत्रात भारतीय महिला संघाने हरमनप्रीतचे अस्त्र बाहेर काढले. हरमनप्रीतने ताहिला आणि अलिसा यांना शेवटच्या क्षणी बाद करत भारताला या सामन्यात पुनरागमन करून दिले. भारताने पहिल्या डावात १८७ धावांची भलीमोठी आघाडी घेतल्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताला कडवी चुरस दिली. 

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मध्यमगती गोलंदाजांनी भारताच्या उर्वरित तीन फलंदाजांना माघारी पा‌ठवत यजमानांचा डाव ४०६ धावांवर संपुष्टात आणला. भारताने तिसऱ्या दिवशी ३० धावांची भर घातली. ॲॅनाबेल सदरलँड हिने पूजा वस्त्रकार (४६) आणि रेणुका सिंग (८) यांना बाद केले. किम गर्थ हिने दीप्ती शर्माचा अडसर दूर केला. भारताकडून दीप्तीने ९ चौकारांसह सर्वाधिक ७८ धावा फटकावल्या. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पटकावलेल्या ४०६ धावा ही कसोटीतील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दीप्ती आणि वस्त्रकार यांच्यात आठव्या विकेटसाठी रंगलेली १२२ धावांची भागीदारी ही या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. 

१८७ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतरही तिसरा दिवस गाजवला तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी. बेथ मूनी आणि फोएबे लिचफील्ड यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र या दोघींनीही आपल्या विकेट लवकर गमावल्या. रिव्हर्स स्विपचा फटका मारण्याच्या नादात लिचफील्डला (१८) स्नेह राणाने त्रिफळाचीत केले. त्यानंतर राणाच्याच गोलंदाजीवर रिचा घोषने बेथ मूनीला (३३) धावचीत पकडले. सिली पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या घोषने अचूक थ्रोद्वारे मूनीचा अडसर दूर केला. 

ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज एलिस पेरी आणि ताहिला मॅकग्रा यांची जोडी जमली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भर घेतली. एलिस पेरी मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत असतानाच, राणाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक यास्तिका भाटियाने तिचा झेल टिपला. पेरीची खेळी ९१ चेंडूंत पाच चौकारांसह ४५ धावांवर संपुष्टात आली. पेरी बाद झाली, त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १४० अशी होती. ताहिला मॅकग्राने या सामन्यातील सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यानंतर तिला राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर उडालेला झेल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राणाच्या हाताला स्पर्श करून गेला. त्यानंतर ५२ धावांवर हरमनप्रीत कौरच्या पहिल्याच चेंडूवर ती पायचीत बाद झाली होती. मात्र पंचांनी तो निर्णय मागे घेतला. 

काही चेंडूंनंतर हरमनप्रीतच्या गोलंदाजीवर चेंडूने मॅकग्राच्या बॅटचा वेध घेतला आणि चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. मॅकग्राने १० चौकारांसह ७३ धावा फटकावल्या. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नसतानाही, भारतीय गोलंदाजांना नशिबानेही साथ दिली नाही. राजेश्वरी गायकवाडने एकही विकेट न मिळवता २७ षटके टाकली. गायकवाडच्या गोलंदाजीवर एलिसा हिलीचा दोन वेळा उडालेला झेल जेमिमा रॉड्रिग्जला पकडता आला नाही. 

हरमनप्रीतच्या गोलंदाजीवर हिलासाठी पायचीतचा केलेला अपील मैदानावरील पंच अनिल चौधरी आणि एम. जानानी यांनी फेटाळून लावला. मात्र पुढच्याच चेंडूवर हरमनप्रीतने हिलीला पायचीत पकडले. आता दिवसअखेर अॅनाबेल सदरलँड १२ धावांवर तर ॲॅशले गार्डनर ७ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक : 

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्व बाद २१९

भारत पहिला डाव : १२६.३ षटकांत सर्व बाद ४०६ (दीप्ती शर्मा ७८, स्मृती मानधना ७४, जेमिमा रॉड्रिग्स ७३; ॲॅशले गार्डनर ४/१००, ॲॅनाबेल सदरलँड २/४१)

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ९० षटकांत ५ बाद २३३ (ताहिला मॅकग्रा ७३, एलिस पेरी ४५, बेथ मूनी ३३, एलिसा हिली ३२; हरमनप्रीत कौर २/२३, स्नेह राणा २/५४).

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in