शतकीय सामन्यात वॉर्नरची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियाची विंडीजवर ११ धावांनी सरशी

या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली
शतकीय सामन्यात वॉर्नरची फटकेबाजी; ऑस्ट्रेलियाची विंडीजवर ११ धावांनी सरशी

होबार्ट : सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (३६ चेंडूंत ७० धावा) कारकीर्दीतील १००व्या टी-२० सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याला लेगस्पिनर ॲडम झाम्पाच्या (२६ धावांत ३ बळी) गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ११ धावांनी मात केली.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१४ धावांचा पाठलाग करताना विंडीजला २० षटकांत ८ बाद २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली. ब्रँडन किंग (५३) आणि जॉन्सन चार्ल्स (४२) यांनी ८९ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर निकोलस पूरन (१८), कर्णधार रोवमन पॉवेल (१४), आंद्रे रसेल (१) यांनी निराशा केली. अखेर जेसन होल्डरचेही (१५ चेंडूंत नाबाद ३४) प्रयत्न अपुरे पडले. झाम्पाने पूरन, चार्ल्स व रसेलचे बळी मिळवले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद २१३ धावांचा डोंगर उभारला. वॉर्नरने १२ चौकार व १ षटकारासह २५वे टी-२० अर्धशतक साकारले. जोश इंग्लिस (३९), टिम डेव्हिड (नाबाद ३७) यांनीही उत्तम फटकेबाजी केली. रसेलने तीन गडी बाद केले. ३७ वर्षीय वॉर्नरने एकदिवसीय व कसोटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली असून तो फक्त टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतो.

logo
marathi.freepressjournal.in