ऑस्ट्रेलिया पहिल्याच सामन्यात गारद; न्यूझीलंडचा तब्बल ८९ धावांनी दणदणीत विजय

विजयासाठी २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १७.१ षटकांत १११ धावांत गारद झाला.
ऑस्ट्रेलिया पहिल्याच सामन्यात गारद; न्यूझीलंडचा तब्बल ८९ धावांनी दणदणीत विजय

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील पहिल्याच सामन्यात शनिवारी न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर तब्बल ८९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार लगावत नाबाद ९२ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

विजयासाठी २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १७.१ षटकांत १११ धावांत गारद झाला. ग्लेन मॅक्सवेल (२० चेंडूंत २८) आणि पॅट कमिन्स (१८ चेंडूंत २१) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाने झुंज देण्याचाही प्रयत्न केला नाही. टीम साऊथी आणि मिचेल सॅन्टेनर यांनी प्रत्येकी तीन विकेट‌्स घेतले. ट्रेंट बोल्टने दोन विकेट्स मिळविले. लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

गतविजेता ऑस्ट्रेलियाने २०२१ मध्ये न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव करून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याचा बदला शुक्रवारी न्यूझीलंडने घेतला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या होत्या.

सलामीवीर कॉन्वेने ५८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार लगावत नाबाद ९२ धावांची खेळी केली. सलामीवीर फिन ॲलन (१६ चेंडूंत ४२), कर्णधार केन विलियम्सन (२३ चेंडूंत २३), ग्लेन फिलिप्स (१० चेंडूंत १२), जेम्स नीशाम (१३ चेंडूंत नाबाद २६) यांनीही अपेक्षित वेळी मोलाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी जोस हेजलवूडने दोन विकेट‌्स घेतले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in