दक्षिण आफ्रिकेचा वनडेमधील सर्वात मोठा पराभव! एकाच डावात तीन शतकांचं वादळ; ऑस्ट्रेलियाने उडवला धुव्वा

ऑस्ट्रेलियाचा हा एकदिवसीय प्रकारातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. मात्र या पराभवानंतरही आफ्रिकेने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
छायाचित्र सौजन्य : एक्स (@dhoni113chennai)
छायाचित्र सौजन्य : एक्स (@dhoni113chennai)
Published on

मकाय : ट्रेव्हिस हेड (१०३ चेंडूंत १४२ धावा), कर्णधार मिचेल मार्श (१०६ चेंडूंत १००) व कॅमेरून ग्रीन (५५ चेंडूंत नाबाद ११८) या तिघांच्या शतकी वादळाचा रविवारी दक्षिण आफ्रिकेला तडाखा बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा २७६ धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा हा एकदिवसीय प्रकारातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला. मात्र या पराभवानंतरही आफ्रिकेने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने पहिल्या दोन लढतींमध्ये अनुक्रमे ९८ व ८४ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २ बाद ४३१ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाची ही एकदिवसीय प्रकारातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २००६मध्ये त्यांनी आफ्रिकेविरुद्धच ४३४ धावा केल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०२३मध्ये नेदरलँड्सला ३०९ धावांनी धूळ चारली होती. त्यांनतर रविवारच्या विजयाचा क्रमांक लागतो.

हेड व मार्श यांनी ३४ षटकांत २५० धावांची सलामी नोंदवली. मग ग्रीन व कॅरी यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भर घातली. हेडने एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे, मार्शने पाचवे, तर ग्रीनने पहिलेच शतक साकारले. ग्रीनने विशेषत: ६ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. कॅरीने ३७ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले.

आफ्रिकेचा प्रथमच इतका मोठा पराभव

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ मात्र २४.५ षटकांत १५५ धावांत गारद झाला. डावखुरा फिरकीपटू कूपर कोनोलीने २२ धावांत ५ बळी मिळवले. डेवाल्ड ब्रेव्हिसने ४९ धावांची एकाकी झुंज दिली. आफ्रिकेला एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच इतक्या धावांनी पराभव पत्करावा लागला. यापूर्वी २०२३च्या विश्वचषकात त्यांनी भारताकडून २४३ धावांनी पराभव स्वीकारला होता. एकंदर आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली.

संक्षिप्त धावफलक

-ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत २ बाद ४३१ (ट्रेव्हिस हेड १४२, मिचेल मार्श १००, कॅमेरून ग्रीन नाबाद ११८) विजयी वि. g दक्षिण आफ्रिका : २४.५ षटकांत सर्व बाद १५५ (डेवाल्ड ब्रेव्हिस ४९, टॉनी डी झॉर्झी ३३; कूपर कोनोली ५/२२)

-सामनावीर : ट्रेव्हिस हेड

-मालिकावीर : केशव महाराज

logo
marathi.freepressjournal.in